जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिका-यांचे मासिक वेतन वेळेवर मिळत नाही तसेच सहाव्या वेतन आयोगाचा तीन वर्षांचा फरक हा अद्यापि भविष्यनिर्वाह निधीमध्ये जमा करण्यास आलेला नाही. जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या कार्यालयातून टाळाटाळ होत असल्याने वैद्यकीय अधिका-यांनी तालुका स्तरावरील ब्लॉक बैठकांवर अघोषित बहिष्कार टाकला आहे.
जिल्ह्यात दोनशे वैद्यकीय अधिकारी व चौदा तालुका आरोग्य अधिकारी असून ते सर्व राजपत्रित दर्जाचे आहेत. जिल्ह्यातील या वैद्यकीय अधिका-यांना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे वेतन अद्यापि मिळालेले नाही. मासिक वेतन दर महिन्याच्या पाच तारखेला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन पूर्वीच देण्यात आले होते. तेही हवेतच विरल्याने वैद्यकीय अधिका-यांची वेतनाअभावी हेळसांड होत आहे.
जिल्ह्यातील या दोनशे वैद्यकीय अधिका-यांचा २००६ ते २००८ या तीन वर्षांचा सहाव्या वेतन आयोगाचा फरक त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये जमा करण्याचा सरकारचा आदेश असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने अद्यापि कार्यवाही केलेली नाही. वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी ही दोन पदे समकक्ष असताना जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या कार्यालयाने मात्र या वैद्यकीय अधिका-यांवर अन्याय करून केवळ १४ तालुका आरोग्य अधिकारी व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा सहाव्या वेतन आयोगाचा फरक भविष्यनिर्वाह निधीमध्ये जमा केला आहे. या दुटप्पी भूमिकेने वैद्यकीय अधिका-यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिका-यांनी कामकाजावर अघोषित बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. वैद्यकीय अधिका-यांनी कामकाज थांबविल्यास जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरण्याची शक्यता असल्याने त्याचा फटका ग्रामीण भागातील रुग्णांना बसणार आहे.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी खरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की कर्मचा-यांची कमतरता असल्याने व आयकराच्या कामांमुळे एप्रिलचे पगार उशिरा होतात. या कामासाठी बाहेरून अतिरिक्त कर्मचारी मागविण्यात आले आहेत. त्यामुळे या महिन्यात वैद्यकीय अधिका-यांचा सहाव्या वेतन आयोगाचा फरक जमा केला जाईल तसेच तालुका आरोग्य अधिका-यांची संख्या कमी असल्याने आम्ही त्यांचा फरक जमा केला आहे असे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2013 रोजी प्रकाशित
वैद्यकीय अधिका-यांचा बैठकांवर अघोषित बहिष्कार
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिका-यांचे मासिक वेतन वेळेवर मिळत नाही तसेच सहाव्या वेतन आयोगाचा तीन वर्षांचा फरक हा अद्यापि भविष्यनिर्वाह निधीमध्ये जमा करण्यास आलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-06-2013 at 01:34 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medical officers undeclared boycott on meeting