अकोला शहरात उपचारासाठी नजीकच्या जिल्ह्य़ातील अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल होतात. या रुग्णांवर पोट भरणारे अनेक खाजगी रुग्णालये शहरात कार्यरत आहेत. जिल्हा रुग्णालयातून रुग्णांना पीआरओ मार्फत खाजगी रुग्णालयात खेचण्याचा प्रताप अनेक प्रतिथयश डॉक्टर बेमालूमपणे करतात. रुग्णसेवेची ही चोरी गंभीर असून सरकारी रुग्णालयाची अनास्था दर्शविणारी आहे.
अकोला जिल्ह्य़ात भौगोलिकदृष्टय़ा नजीकच्या हिंगोली, परभणी, बुलढाणा, खामगाव, वाशिम या ठिकाणाहून मोठय़ा प्रमाणात रुग्ण दाखल होतात. त्यातच अकोला हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व मध्य रेल्वेच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे प्रवासाच्या सोयीच्या दृष्टीने येथे मोठय़ा प्रमाणात रुग्ण येतात. जिल्हा रुग्णालय तसे चांगलेच मोठे आहे. बाजूला असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा त्याला मोठा फायदा होतो. पण, या ठिकाणी येणाऱ्या गरजू रुग्णांना पळविण्यात येथील काही खाजगी रुग्णालय अग्रेसर आहे. या पळवलेल्या रुग्णांच्या आधारे त्यांची उपजिविका चालते. यासाठी काही खाजगी रुग्णालयांनी त्यांचे पीआरओ अर्थात जनसंपर्क अधिकारी नेमले आहेत. त्यांना विशिष्ट रुग्ण आणल्यास मोठय़ा प्रमाणात कमिशन देण्याचा पायंडा येथे पाडला गेला आहे. त्यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणा खिळखिळी करण्यात खाजगी डॉक्टरांनी घेतलेला पुढाकार येथे स्पष्टपणे उघड होतो.
सरकारी रुग्णालयात कमी खर्चात होणारे उपचार गरीब व गरजू रुग्णांना चांगलेच महागात पडते. त्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात आरोग्य सेवेचे खाजगीकरण झाल्याचे चित्र आहे. या खाजगीकरणातून मोठय़ा प्रमाणात काही ठिकाणी अवैध पध्दतीची कटप्रॅक्टिस सुरु झाली आहे. अशीच काय ती परिस्थिती जिल्हा महिला रुग्णालयाची आहे. पळविण्यात आलेल्या रुग्णांना लुबाडण्याचे काम काही खाजगी डॉक्टर सर्रासपणे शहरात करतात. सरकारी रुग्णालयातून अशा प्रकारे होणारी रुग्णांची पळवापळवी थांबविण्याची गरज असून त्या दृष्टीने सरकारने व्यापक उपाय योजना आखण्याची गरज आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना त्यांची खाजगी सेवा बंद करण्याचा सल्ला सरकारने देण्याची गरज आहे. तसेच खाजगी गोपनीय तपास पथकामार्फत सरकारी रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा शोध घेण्याची गरज आहे. अशा पाहणीत सरकारी रुग्णांवर खाजगीत उपचार करणाऱ्या डॉक्टरांची सनद रद्द करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.
संपूर्ण जिल्ह्य़ातून व शहरातून जैव-वैद्यकीय कचरा गोळा करण्याची यंत्रणा आहे. पण, जिल्हा रुग्णालयातील जैव वैद्यकिय कचरा कुठे जातो असा प्रश्न उपस्थित होतो. जिल्हा रुग्णालयातील जैव वैद्यकिय कचरा जाळण्यासाठी असलेली भस्मीकरण यंत्रणा गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात जैव वैद्यकिय कचरा रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात अस्ताव्यस्त पडलेला दिसतो. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची भिती या क्षेत्रातील जाणकार स्पष्ट करतात. प्रदूषण विभागाने जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मोठा दंड केल्याशिवाय ही समस्या मार्गी लागण्याची सुतराम शक्यता नाही. जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँक ही रिप्लेसमेंट शिवाय रक्त उपलब्ध करुन देत नसून त्यामुळे रुग्णांना मोठी अडचण येत आहे. या सर्व समस्या आरोग्य विभागाने तात्काळ सोडविण्याची गरज आहे.