शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) व सुपर स्पेशालिटीमध्ये वैद्यकीय विक्री प्रतिनिधींना (एमआर) प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेशच मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहे.
बाह्य़रुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांची तपासणी सुरू असतानाच वैद्यकीय प्रतिनिधी येऊन डॉक्टरांची भेट घेतात. डॉक्टरही रुग्णांना बाजूला सारून प्रतिनिधींसोबत तासनतास बोलत बसतात. परिणामी रुग्णांची तपासणी होत नाही आणि उपचारासही विलंब होतो. मेडिकल व सुपरमध्ये सकाळी ९ ते दुपारी १ अशी बाह्य़रुग्ण विभागाची वेळ आहे. या वेळेतच डॉक्टर रुग्णांची तपासणी करतात. परंतु रुग्ण तपासणी सुरू असतानाच वैद्यकीय प्रतिनिधी येऊन डॉक्टरांना भेटतात. शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांचे खासगी दवाखाने आहेत. या डॉक्टरांना त्यांच्या दवाखान्यामध्ये भेटता येत नाही, म्हणून हे वैद्यकीय मेडिकल व सुपर स्पेशालिटीमध्ये येतात. आपल्या कंपनीचीच औषधे डॉक्टरांनी लिहून द्यावी, अशी गळ घालत प्रतिनिधी तासनतास डॉक्टरांशी बोलत असतात. डॉक्टरही रुग्णांना वेटिंगवर ठेवून प्रतिनिधींशी गप्पा मारतात. परिणामी रुग्ण वाट बघून बघून निराश होतात आणि निघून जातात. दररोज रुग्णालयात हाच प्रकार सुरू असतो. याप्रकरणी अनेक तक्रारी अधिष्ठात्यांकडे आल्या होत्या.
त्यातच युवक काँग्रेस सुपर व मेडिकलमधील विविध समस्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यात रुग्णांना योग्य व वेळेवर सुविधा द्यावी, रुग्णांना शासकीय औषधे द्यावीत, सेवा उपलब्ध असताना रुग्णांना बाहेर पाठवू नये, बाह्य़रुग्ण विभागात वैद्यकीय प्रतिनिधींना येण्यास मज्जाव करावा, आदींचा समावेश आहे. या आंदोलनाची दखल घेत अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी काही दिवसांपूर्वीच एक परिपत्रक काढून ते सर्व विभागप्रमुखांना पाठवले आहेत. त्यात, वैद्यकीय विक्री प्रतिनिधींना ओपीडी सुरू असताना आतमध्ये येऊ देऊ नये व त्यांच्याशी चर्चा करू नये, असा उल्लेख आहे. तसेच वैद्यकीय विक्री प्रतिनिधींनी आतमध्ये येऊ नये, असे फलक लावावे, अशी सूचनाही त्यात करण्यात आली आहे.
जेनेरिक औषधीच लिहून द्या
कोणत्याही खासगी औषध विक्रेते, वैद्यकीय धर्मदाय संस्थांनी पुरविलेल्या ‘प्रिस्क्रिप्शन पॅड’वर रुग्णांना कुठलेही औषध लिहून देण्यात येऊ नये. रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना ‘जेनेरिक’ औषधीच लिहून द्यावी, अशा स्पष्ट सूचनाही डॉ. राजाराम पोवार यांनी मेडिकल व सुपर स्पेशालिटीतील डॉक्टरांना केले आहेत. जी सेवा शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे, अशावेळी रुग्णांना बाहेर न पाठवता शासकीय रुग्णालयातच पाठवावे, असेही सांगण्यात आले आहे. अधिष्ठात्यांनी केलेल्या सूचनांचे पालन किती डॉक्टर्स करतात, हे थोडय़ाच दिवसात कळून येणार आहे.

Story img Loader