काही विशिष्ट औषध कंपन्या ब्रॅण्डच्या नावाखाली रुग्णांची मोठय़ा प्रमाणात आर्थिक लूट करीत असल्याचे लपून राहिलेले नाही. ब्रॅण्डेड कंपनीची पाच हजार रुपयांना मिळणारी तीच जेनेरिकची औषधे खरेदी केल्यास दीड हजार रुपयांना मिळतात. यावरून ब्रॅण्डेड कंपन्या आणि जेनेरिकच्या औषधांच्या किमतीतील तफावत लक्षात येते. त्यामुळे रुग्णांनी ब्रॅण्डेड कंपनीच्या औषधांचा आग्रह न धरता जेनेरिक औषधांचीच मागणी डॉक्टरांकडे करावी, असे आवाहन जनमंचने केले आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्यांची एक लॉबी कार्यरत असून ती संबंधित ब्रॅण्डचीच औषधे लिहून देण्यासाठी डॉक्टरांना विविध आमिषे दाखवत आहेत. डॉक्टरही या आमिषाला बळी पडून वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत. जनमंचने मात्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न चालवला आहे. जनमंचने शहरात दोन वर्षांपूर्वी जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करून नागरिकांची लाखो रुपयांची बचत केली आहे. अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक आपल्या डॉक्टरांना जेनेरिक औषधे लिहून देण्याचा आग्रह करतात. अशा हजारो रुग्णांची लाखो रुपयांची बचत होत आहे. याचे सर्व श्रेय जनमंचलाच जात आहे.
डॉक्टरांनी चिठ्ठी दिली की रुग्ण अथवा त्याचे नातेवाईक संबंधित औषधीच्या दुकानात जाऊन औषधी खरेदी करतात. डोकेदुखी, अंगदुखी व तापासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचे मूळ नाव ‘पॅरासिटॉमल’ असे आहे. ब्रॅण्डेड कंपनीच्या क्रोसिन, डिस्प्रिनच्या दहा गोळ्या ५० रुपयांपयर्ंत विकल्या जातात. तर जेनेरिक नावाने विकली तर केवळ पाच रुपयात मिळतात. ग्राहक जागरुक नसल्याचा फायदा या ब्रॅण्डेड कंपन्या घेत आहेत. अॅन्टीबायोटिक्स असलेले ग्लॅक्सो कंपनीचे ‘अॅमेनटीन-६२५’ च्या सहा स्ट्रीपची किंमत २६६ रुपये आहे. तर तीच सिप्ला कंपनीची जेनेरिक नाव असलेली ‘नोवाक्लाव-६२५’ केवळ ८७ रुपयांना मिळते. मधुमेहावरील जेनेरिक नाव असलेल्या सिप्ला कंपनीच्या ‘मेटाफार्मिन’च्या दहा गोळ्या अवघ्या ९ रुपयाला मिळतात. तर फ्रँको इंडिया ब्रॅण्डेड कंपनीच्या ‘ग्लायसिफेज’च्या गोळ्या २५ रुपयांना विकल्या जातात. रक्तदाबावर आवश्यक असलेली ग्लेनमार्क ब्रॅण्डेड कंपनीच्या ‘टेलमा-एच’च्या दहा गोळ्या दीडशे रुपयाला मिळतात. तर जेनेरिक नाव असलेल्या ‘टेलमावास-एच’ च्या दहा गोळ्या अवघ्या ३५ रुपयांना मिळतात. यावरून ब्रॅण्डेड कंपन्या रुग्णांची प्रचंड आर्थिक लूट करीत असल्याचे दिसून येते. जेनेरिक औषधे तुलनेने कमी किंमतीत मिळतात, यावरून ती गुणवत्तापूर्ण व चांगल्या प्रतिची नसतात, असा आरोप ब्रॅण्डेड कंपन्या करीत असतात. ब्रॅण्डेड आणि जेनेरिक औषधांच्या किमतीतील तफावत पाहून आतातरी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी जागरुक होण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत जेनेरिक जनमंचचे समन्वयक प्रभाकर खोंडे यांनी व्यक्त केले.
मनसुखलाल आयोगाची शिफारस
दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८० मध्ये नेमलेल्या मनसुखलाल हाथी आयोगाने जीवनरक्षक औषधी जेनेरिक नावानेच विकाव्यात, अशी शिफारस केली होती. परंतु या शिफारशीची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नाही. बांगलादेशाने मात्र जेनेरिक औषधेच खरेदी करावी, असा कायदा केला आहे. याशिवाय अमेरिकेत ८० टक्के तर इंग्लडमध्ये ८२ टक्के औषधे ही जेनेरिक दुकानातूनच विकली जात असल्याकडे खोंडे यांनी लक्ष वेधले.
(उत्तरार्ध)
जेनेरिक औषधेच का ?
ही औषधे ब्रॅण्डेड औषधाप्रमाणेच गुणकारी असतात.
या औषधांची मात्रा (डोस) ब्रॅण्डेड औषधाइतकीच असते. त्याचप्रमाणे ती तितकीच दुष्परिणामरहित असतात.
गुणवत्तापूर्ण व तितक्याच चांगल्या प्रतिची असतात.
ही औषधे औषधशास्त्रदृष्टय़ा व उपयुक्ततेच्या बाबतीत ब्रॅण्डेड औषधांच्या दर्जाची असतात.
ही औषधे सिप्ला, रॅनबॅक्सी, अलेबिक, ल्युपिन, बायोकेम अशा नामांकित कंपन्यासुद्धा तयार करतात.
ही औषधे महागडय़ा ब्रॅण्डेड औषधासाठी किफायतशीर किमतीत मिळणारी पर्यायी औषधे आहेत.
ही औषधे स्वस्त मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांच्या निर्मात्यांना संशोधन व नवनिर्मितीसाठी लागणारा अमाप खर्च करावा लागत नाही. तसेच जाहिरातीसाठी खर्च करावा लागत नाही.