जनतेच्या आरोग्य रक्षणाचा मुद्दा पुढे करीत अन्न व औषध प्रशासनाचा राज्यभरात औषध विक्रेत्यांविरूध्द बेकायदेशीर कारवायांचा धडाका सुरू केला आहे. या कारवाईच्या निषेधार्थ १६ ते १८ डिसेंबर या सलग तीन दिवशी राज्यातील ५५ हजार औषध विक्रेते आपली दुकाने बंद ठेवणार आहेत. तसेच राज्यातील औषध विक्रेत्यांचा भव्य मोर्चा नागपूर येथे अधिवेशन काळात १८ डिसेंबर रोजी धडकणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संघटन सचिव सुधीर खराडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
औषध विक्रेत्यांवर होत असलेल्या कारवाईची माहिती देताना खराडे म्हणाले, उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने वेळोवेळी दिलेल्या निकालाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून अत्यंत क्षुल्लक कारणासाठी परवाने रद्द करणे, तसेच तत्काळ खरेदी विक्री बंद करणे अशा अतिरेकी कारवायामुळे औषध विक्रेत्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे.
राज्य संघटनेने याबाबत मुख्यमंत्री तसेच संबंधित विभागाचे मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन निवेदन देऊन चर्चा करून आपले प्रश्न मांडले असताना १५ डिसेंबर २०१२ रोजी कोल्हापूर येथे अन्न व औषध प्रशासनाकडून लेखी १० मागण्या मान्य करून देखील त्यावर आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही. आश्वासनाशिवाय कुठलाही समाधानकारक तोडगा आजपर्यंत निघू शकलेला नाही. एका उन्मत अधिकाऱ्यासमोर शासन पूर्णत हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. औषध विक्रेत्यांची न्याय्य बाजू ऐकून घेण्यास व समाधानकारक तोडगा काढण्यास शासनाची मानसिकता नाही असे चित्र निर्माण झाल्यामुळे पुन्हा आंदोलनात्मक भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही.
जनतेची व शासनाची दिशाभूल करीत औषध विक्रेत्यांना बदनाम करण्याचा घाटच प्रशासनाने घातला आहे. प्रशासनाला खरोखरच जनतेच्या आरोग्याची काळजी असती तर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अन्य ठिकाणी होणारे बेकायदेशीर व्यवहार, कायद्याचे उल्लंघन करून देण्यात येणारी आरोग्यसेवा, बेकायदेशीरीत्या चालत असलेली आरोग्यसेवा याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी सचिव अनिल बडदारे, खजानिस संजय शेटे, उपाध्यक्ष सुनिल हाळे, सहसचिव जयंतराव शेडे उपस्थित होते.
राज्यातील औषध विक्रेत्यांचा १६ पासून तीन दिवसांचा बंद
जनतेच्या आरोग्य रक्षणाचा मुद्दा पुढे करीत अन्न व औषध प्रशासनाचा राज्यभरात औषध विक्रेत्यांविरूध्द बेकायदेशीर कारवायांचा धडाका सुरू केला आहे. या कारवाईच्या निषेधार्थ १६ ते १८ डिसेंबर या सलग तीन दिवशी राज्यातील ५५ हजार औषध विक्रेते आपली दुकाने बंद ठेवणार आहेत.
First published on: 13-12-2013 at 01:43 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medicine seller close action chemist rally kolhapur