राज्य सरकारने ‘मेस्मा’ म्हणजेच अत्यावश्यक कायद्याचा बडगा दाखवल्यानंतरही ‘बंद’चे हत्यार पाजळणाऱ्या औषध विक्रेत्यांनी दुकाने बंद करण्याचा देखावा केला असला, तरी बहुतांश विक्रेत्यांनी मागच्या दाराने औषध विक्री केल्याचे सांगण्यात आले.
आपल्या विविध मागण्यांसाठी किरकोळ औषध विक्रेत्यांनी तीन दिवसांचा राज्यव्यापी बंद पुकारला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून होणारा छळ थांबवावा, या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या ‘बंद’ला जिल्ह्यात काहीअंशी प्रतिसाद मिळाला. बहुतांश दुकाने बंद होती. परंतु अनेक विक्रेते मागच्या दाराने खुलेआम औषधी विकत होते. औषध विक्रेत्यांच्या ‘बंद’चा रुग्णांवर फारसा फरक जाणवला नाही.
अन्न व औषध प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता कायद्यातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, आकसातून कारवाई करू नये. अशा आंदोलनामुळे सामान्य ग्राहक भरडला जाऊ नये, अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीने व्यक्त केली. जिल्ह्यातल्या औषध विक्रेत्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी कार्यालयात या वेळी औषध विक्रेत्यांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, रुग्णांची गरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने नांदेड शहर, तसेच जिल्ह्यातील काही दुकाने सुरू ठेवली होती. आपत्कालीन हेल्पलाईन यंत्रणा उभारून असोसिएशनने सुरू ठेवलेल्या दुकानांत रुग्णांच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती.
बीडला आरोग्यसेवेचे तीनतेरा
वार्ताहर, बीड
संपावर गेल्यास अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा बडगा उगारल्यानंतरही शहरातील बहुतांश औषध विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली. दरम्यान, सोमवारपासून सुरू झालेल्या औषध विक्रेत्यांच्या संपात विक्रेते सामील झाल्याने रुग्णांचे मात्र हाल होणार आहेत.
बीडसह राज्यातील औषध विक्रेत्यांनी अन्न व औषध विभागाच्या जाचक अटीच्या निषेधार्थ संपाचा इशारा दिला होता. विक्रेत्यांनी संपाचे हत्यार उपसल्यानंतर सरकारनेही अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत संपात सहभागी होणाऱ्या विक्रेत्यांना कारवाईचा बडगा उगारून संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या भूमिकेने विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, मात्र संघटनेने कणखर भूमिका घेत सोमवारपासून संप सुरू केला. शहरातील बहुतांशी औषधे दुकाने बंद राहिली. परिणामी, रुग्णांना त्रास सहन करावा लागला. केवळ नियमित रुग्णांच्या विनंतीवरून शहरातील बार्शी रस्त्यावरील रोहन मेडिको हे एकच दुकान सुरू होते. संपात मोठय़ा संख्येने औषध विक्रेते सहभागी झाल्याने आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडून पडली आहे.
‘बंद’मुळे आरोग्यसेवा विस्कळीत
राज्य सरकारने ‘मेस्मा’ म्हणजेच अत्यावश्यक कायद्याचा बडगा दाखवल्यानंतरही ‘बंद’चे हत्यार पाजळणाऱ्या औषध विक्रेत्यांनी दुकाने बंद करण्याचा देखावा केला असला, तरी बहुतांश विक्रेत्यांनी मागच्या दाराने औषध विक्री केल्याचे सांगण्यात आले.
First published on: 17-12-2013 at 01:49 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medicine seller close mesma nanded