आणखी १५ दिवस प्रतीक्षा

जिल्ह्य़ातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा असून, पुरवठा सुरळीत होण्यास आणखी १५ दिवस लागतील, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
गेल्या ४ महिन्यांपासून औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात थांबतच नाहीत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन कारवाया केल्या. काही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा घरभाडे भत्ताही थांबविण्यात आला. असे चित्र असले, तरी आरोग्य विभागात बाह्य़ रुग्णांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्याची आकडेवारी सरकारदरबारी आहे. आरोग्य यंत्रणा सुधारली की आजार वाढले, असा प्रश्न आकडेवारीमुळे निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्य़ातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २ लाख८ हजार ५५३ रुग्णांनी उपचार घेतले. या वर्षी हा आकडा ३ लाख २९ हजारांवर गेल्याच्या नोंदी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य केंद्रांत औषधे नाहीत. १५ प्रकारची प्रतिजैविके, सलाइन व विविध इंजेक्शने उपचार केंद्रात आवश्यक असतात. सरकारकडून औषधांचा पुरवठाच न झाल्याने ग्रामीण भागात रुग्णांचे हाल होत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या तक्रारी वाढल्यानंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी अचानक आरोग्य केंद्रांत तपासणीचा धडाका सुरू केला. दि. ४ डिसेंबरला वैजापूर तालुक्यातील गाढेपिंपळगाव, शिरूर येथे अचानक भेट दिली असता तेथील डॉ. सतीश राठोड, डॉ. भाले व डॉ. तुपे वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यांना कारणे दाखवा नोटिस देण्यात आल्या आहेत. जिल्ह्य़ात अशा प्रकारच्या कारवाया केल्यानंतर तक्रारीचे प्रमाण कमी झाले नाही. आरोग्य विभागातील खरेदी प्रकरणांमध्ये डॉ. प्रमोद माने यांची नुकतीच बदली करण्यात आली. अशा स्थितीत बाह्य़ रुग्णांची संख्या मात्र वाढल्याचा दावा केला जात आहे.     

Story img Loader