एरवी पर्यावरणाचा ऱ्हास झाला म्हणून शंख करणारी मंडळी अपवाद वगळता दोन चार झाडे लावून मोकळी होतात. वृक्षारोपणातच पर्यावरण संवर्धनाचा मंत्र देत त्यांचा मोर्चा दुसरीकडे वळतो. मात्र घराच्या चार भिंतीत राहून काही उपक्रम राबविता येईल का, या विचाराने प्रेरित होत नाशिक येथील प्रमिला पाटील यांनी आपल्या १० बाय १५ च्या टेरेसमध्ये पर्यावरण पूरक अशी ‘टेरेस गार्डन’ ची वेगळी वाट निवडली.
पाटील यांना शेतीची प्रचंड आवड. डी.एड् पूर्ण झ़ाल्यानंतर त्यांनी प्रामुख्याने आपली ही आवड जोपासण्याकडे कल ठेवला.  ग्रामीण जीवनशैलीचा त्यांच्यावर पगडा असल्यामुळे दिखाऊपणाची त्यांना प्रचंड चीड. यामुळे आपल्याला मिळणारा वेळ हा त्यांनी शेतीला पूरक अशा ‘टेरेस गार्डन’ साठी वापरण्याचे ठरविले. या आवडीला त्यांच्या शिक्षकी पेशाने खतपाणीच घातले. पाटील यांची स्काऊट गाईड दौऱ्यामुळे जिल्हा, राज्य तसेच देशात सर्वत्र कायम भ्रमंती राहते. दौऱ्यानिमित्त कुठेही जाण्याआधी परिसराची भौगोलिक परिस्थिती, त्या ठिकाणाची खासियत, याचा विचार करून तेथील वैशिष्टयपूर्ण वनस्पती त्या आपल्या टेरेस गार्डनसाठी घेऊन येतात.
केवळ वनस्पती आणायची आणि आकारमानानुसार त्यांना लहान-मोठय़ा कुंडीत स्थान द्यावयाचे, इथवर त्यांचे काम थांबत नाही. निसर्गाच्या या अमूल्य ठेव्याची जपवणूक आपल्याकडून तितकीच चांगल्या पध्दतीने होण्यासाठी त्यांनी ‘अमृततुल्य माती’चा पर्याय स्वीकारला आहे. रोपांची लागवड करतांना त्या वेगळ्या प्रकारची खास घरी तयार केलेली माती वापरतात. यामध्ये अर्धी बादली शेण, एक लिटर गोमूत्र, अर्धा किलो गुळ, अर्धी बादली पाणी, हे अमृततुल्य पाणी तयार झाल्यावर यातील काही अंश काढून घेऊन हे संपूर्ण मिश्रण साधारणत आठ ते १० दिवस कुजू देतात. हे संपूर्ण मिश्रण एका पसरट भांडय़ात जमा करून यानंतर काच व प्लास्टिक वगळता जमा झालेल्या सुक्या कचऱ्याचा थर देतात. त्यावर अर्धा इंच काळ्या मातीचा थर देतात. तयार झालेले हे मिश्रण वर-खाली करून त्यावर साध्या पाण्याचा शिडकावा दिला जातो. अडीच ते तीन महिन्याच्या कालावधीनंतर तयार झालेली ही माती ‘अमृततुल्य माती’ असते. या मातीत विविध प्रकारच्या वनस्पतींची लागवड करतात. त्यास पूरक म्हणून सुरूवातीस तयार झालेल्या पाण्यात साधे पाणी मिसळून त्या पाण्याचा शिडकावा हा किटकनाशक म्हणून करतात.
पाटील यांच्या आवडीमुळे त्यांच्या बागेत १५० पेक्षा अधिक औषधी वनस्पतींसह विविध प्रकारच्या पालेभाज्या, मसाल्याचे पदार्थ, फळभाज्या, फुले फुलली आहेत.
राम, कृष्ण, कापुरी, लवंगी असे विविध तुळशीचे प्रकार, वेलदोडे-दालचिनी-लवंग-मिरी यांचा समावेश असलेली ‘मिक्स मसाला’ वनस्पती, खोकल्यावर रामबाण उपाय ठरणारा अक्कलकारा, अडूळसा, दम्यावर उपयुक्त अशी दमवेल, दुर्मीळ अशी चायनीज् पालक, इन्शुलिन, सताप, तीनधारी कॅक्टस्, हाडीसांदन, कमरंग, सिडलेस लिंबू, चकुत्रा, कळलावी, समुद्रवेल अशा विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. प्रत्येक वनस्पती ही कुठल्या आजारावर उपयुक्त आहे, त्यांची मात्रा कशी असावी, याचा संपूर्ण अभ्यास त्यांच्या वतीने सुरू आहे. परिसरातील गरजू व्यक्तींना त्या या औषधी वनस्पती नि:शुल्क देतात. त्यांची बाग अधिक बहरावी यासाठी सोसायटीतील काहींनी आपले टेरेस आणि वरची गच्ची खुली करून दिली आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा