जिल्ह्य़ातील सालेकसा येथील ईठाई आश्रमशाळेला आमदार रामरतन राऊत यांनी, तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इळदा शासकीय आदिवासी आश्रमशाळेला आमदार राजकुमार बडोले यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान आश्रमशाळेतील गलथान कारभार आमदारांच्या निदर्शनास आला. त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावावर संबंधितांकडून होणाऱ्या शासकीय निधीच्या लुटीवर नाराजी व्यक्त केली, तसेच संबंधितांची चौकशी करून आश्रमशाळेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र ते केवळ आश्वासनच राहू नये, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून केली जात आहे.
सालेकसा येथील ईठाई आश्रमशाळेतील दहावीचा विद्यार्थी हिरालाल कोसमे हा गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता आहे, मात्र आश्रमशाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी बेपत्ता असल्याची माहिती पालकांना व पोलिसांना पंधरा दिवसानंतर दिली. दरम्यान, आमदार रामरतन राऊत काल, रविवारी रात्री आठ वाजता तहसीलदार शीतलकुमार यादव, सरपंच योगेश राऊत, मनसे तालुकाध्यक्ष ब्रजभूषण बस, काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल फुंडे, वासुदेव चुटे, अमित अग्रवाल यांच्यासह आश्रमशाळेत पोहोचले. यावेळी विद्यार्थ्यांनी आमदारांजवळ आपली व्यथा मांडताना सांगितले, न्याहारीच्या नावाखाली आपल्याला रात्रीचे अन्न फोडणी देऊन वाढले जात असून जेवणही निष्कृष्ट दर्जाचे दिले जाते. मुलींसाठी स्वतंत्र झोपण्याची सोय नसून त्यांना वर्गखोलीतच झोपविले जाते, मात्र वर्गखोलीला दरवाजे नसल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहतो. वीज बल्बची अपुरी व्यवस्था असल्याने विद्यार्थ्यांना अपुऱ्या प्रकाशात अभ्यास करावा लागतो. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होत नाही. विद्यार्थ्यांना उघडय़ावर आंघोळ करावी लागते. शालेय साहित्यही बरोबर मिळत नसल्याने अभ्यास कसा करावा, असा प्रश्न पडतो. अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांनी आमदारांसमोर मांडल्या. यावेळी आमदार राऊत यांनी आश्रमशाळा प्रशासनाची कानउघाडणी केली असून शाळेची चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इळदा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेला आमदार राजकुमार बडोले यांनी नुकतीच भेट दिली असता ईठाई आश्रमशाळेप्रमाणेच येथेही गलथान प्रकार समोर आला. आमदार बडोले यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रकाश गहाणे, बाजार समितीचे सभापती कासीम जमा कुरेशी उपस्थित होते. आमदारांच्या भेटीदरम्यान आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रशिक्षणावर गेल्याची माहिती देण्यात आली, तर मुलींच्या अधीक्षिका  जानेवारी महिन्यापासून शाळेतच आल्या नसल्याची माहिती समोर आली, मात्र प्रभारी मुख्याध्यापकांनाही याची माहिती नव्हती. दहा एकर परिसरातील या शाळेच्या सुरक्षेसाठी येथे चौकीदार नाही. यासोबत चौकशीदरम्यान, शाळेच्या मालमत्तेचे रजिस्टर, साहित्य पुरवठय़ाचे रजिस्टर व उपलब्ध साहित्याची नोंद नसल्याचे उघडकीस आले. दोन वर्षांपूर्वी शाळेला पुरविण्यात आलेले लाईट धूळखात पडले असून शौचालय असूनही त्याचा वापरास मज्जाव असल्याचे दिसले. वाचनालय व संगणक कक्षासाठी एकच खोली असून त्यांचा उपयोग विद्यार्थ्यांना होत नाही, असे अनेक प्रश्न आमदारांसमोर मांडण्यात आले. याबद्दल आमदार बडोले यांनी नाराजी व्यक्त केली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा