आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही मिरवणुकीचा मार्ग हा पूर्वीप्रमाणे राहणार असून ही मिरवणूक नियोजित वेळेत पूर्ण केली जाईल तसेच या मिरवणुकीत भाविक सहभागी होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन साधू-महंतांनी दिले आहे. पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, साधू-महंतांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. या वेळी मागील सिंहस्थात घडलेल्या चेंगराचेंगरीची घटना लक्षात घेऊन काय काय खबरदारी घेता येईल, यावर मंथन झाले.
२०१५-१६ मध्ये नाशिक शहरात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे कुंभमेळ्यासाठी येणारे तिन्ही आखाडय़ांचे साधू-महंत, खालसे आणि भाविकांची सुरक्षा या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शाही मिरवणूक, तिचा मार्ग, साधूग्राममधील सुरक्षा व्यवस्था आदी वेगवेगळ्या मुद्दय़ांवर या वेळी सखोल चर्चा झाली. शाही मिरवणुकीच्या मार्गात कोणताही बदल करण्यास साधू-महंत तयार नाही. गत वेळी महापालिकेने नवीन शाही मार्गाची बांधणी केली. परंतु, शहराच्या अंतर्गत भागातून जाणारा जुना मार्ग बदलण्यास साधू-महंतांची तयारी नाही. यामुळे आगामी सिंहस्थातही शाही मिरवणूक पूर्वीच्या मार्गावरून काढली जाणार आहे. गत वेळी काळाराम मंदिराकडून नदीकडे येणाऱ्या रस्त्यावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. अनेक भाविकांना त्यात प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेची चौकशी रमणी समितीने केली होती. या समितीच्या अहवालानुसार कायद्याच्या चौकटीत राहून कुंभमेळा यशस्वी करण्याची संकल्पना पोलीस यंत्रणेने मांडली. साधू व भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना करता येईल यावर वेगवेगळी मते मांडण्यात आली. साधू-महंतांची संख्या निश्चित करून त्यांना त्यांचे आखाडे वा खालसानिहाय ओळखपत्र देता येतील काय, असाही एक  विचारपुढे आला.
पर्वणीच्या दिवशी शाही मिरवणूक संपेपर्यंत रामकुंड भाविकांना स्नानासाठी बंद राहणार आहे. या दिवशी रामकुंड परिसरात लाखो भाविकांची गर्दी उसळते. एकाच ठिकाणी स्नानासाठी गर्दी होऊन काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून टाकळी व दसक या ठिकाणी नव्याने घाट बांधले जाणार आहे. त्यांचा वापर कसा करायचा याचे स्वतंत्रपणे नियोजन करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. शाही मिरवणुकीत सर्वाचा सहभाग आवश्यक असून मिरवणूक लवकरात लवकर काढून सकाळी १० वाजेपर्यंत संपविण्यात यावी, अशी सूचना पोलीस यंत्रणेने केली. गत वेळी पर्वणीच्या दिवशी ५० लाख भाविक आले होते. या वेळी त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाही मिरवणूक वेळेत संपविली जाईल, असे आश्वासन साधू-महंतांनी दिले. शाही मिरवणुकीत भाविकांना सहभागी होऊ दिले जाणार नाही. मिरवणुकीत वाहनांची संख्या कमी ठेवण्यास त्यांनी सहमती दर्शविली. बैठकीस शहरातील तिन्ही आखाडय़ांचे स्थानिक साधू-महंत, पुरोहित संघाचे प्रमुख, वरिष्ठ पोलीस अधिकारी
उपस्थित होते.

Story img Loader