उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा खासदार मायावती यांची जाहीर सभा येत्या रविवारी, १७ फेब्रुवारीला कस्तुरचंद पार्क मैदानावर सकाळी ११ वाजता होत असून सभेला विक्रमी गर्दी जमण्याची अपेक्षा केली जात आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर विदर्भातील बसपच्या एकंदर स्थितीची चाचपणी या सभेच्या निमित्ताने मायावती करणार असून यंदाच्या वर्षांतील विदर्भातील ही पहिलीच मोठी राजकीय सभा राहील.
 मायावतींचे शनिवारी, १६ फेब्रुवारीला दुपारी नागपुरात आगमन होणार असल्याचे बसपच्या सूत्रांनी सांगितले. सभेचे महत्त्व लक्षात घेता बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड गेल्या आठवडय़ापासून नागपुरात तळ ठोकून आहेत. त्यांनी बूथ पातळीपासून प्रदेश स्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांना कामाला भिडवल्याने किमान १ लाखाच्यावर लोक जमतील, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
मायावतींच्या सभेला होणारी गर्दी कस्तुरचंद पार्क परिसराभोवतालच्या वाहतूक व्यवस्थेवर परिणाम करणार असल्याने अनेक मार्ग बंद ठेवावे लागणार आहेत.
मायावतींच्या स्वागतासाठी नागपूर शहरभर होर्डिग्ज, पोस्टर्स, पताका लावण्यात आल्या आहेत. कस्तुरचंद पार्कवर लाल किल्ल्याची प्रतिकृती असलेल्या भव्य मंचाची तयारी जवळजवळ पूर्ण झाली
आहे.
कार्यकर्ते मैदानात रात्रंदिवस राबत आहेत. या सभेत काही राजकीय पक्षांना खिंडार पडून त्यांचे कार्यकर्ते बसपत सामील होतील, असा दावा विलास गरुड यांनी केला आहे. कस्तुरचंद पार्कवरील सभेनंतर १२ वाजता बसपचे महाराष्ट्र राज्यस्तरीय संमेलन होत असून यात मायावती मार्गदर्शन करणार
आहेत. 

Story img Loader