पालिकेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या चौकशीसह इतर अनेक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी सभागृहातच आंदोलन करण्याचे ठरवून गुरूवारी आगमन केले होते. परंतु महापौरांनी पुन्हा एकदा सभा तहकूब केल्याने डोईवर मागण्यांचा डोलारा घेऊन विशेष अवतारात दाखल झालेल्या दिनकररावांची सर्व तयारी वाया गेली. पुढील सभेसाठी पुन्हा त्यांना सर्व तयारी करावी लागणार आहे. सभागृहाबाहेर पडणाऱ्या सदस्यांमध्ये दिनकररावांच्या नवीन अवताराचीच अधिक चर्चा होती. तहकूब सभेतही ते चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले, हे विशेष.
वादग्रस्त विषय प्रलंबित असताना इतिवृत्तात ते विषय मंजूर दाखविले गेले. हे सर्व विषय नामंजूर करावे, पावसाळी गटार योजनेच्या समितीचे कामकाज सुरु करावे, घरकुल योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक करावी, या दिनकररावांच्या प्रमुख मागण्या होत्या. त्यासाठी ते मागण्या लिहिलेली टोपी घालून सभागृहात बसले होते. परंतु सभा सुरू होताच त्यांचा भ्रमनिरास झाला. दिग्दर्शक यश चोप्रा, विनोदी अभिनेता जसपाल भट्टी, सिध्दयोगाचे प्रचारक नारायणकाका ढेकणे महाराज, शंकरराव काळे, यांसह विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करुन महापौर अॅड. यतीन वाघ यांनी सभा तहकूब करीत असल्याचे जाहीर केले.
अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालून साधकांच्या जीवनात चैतन्याचा झरा निर्माण करणारे लोकनाथतीर्थ आश्रमाचे प्रमुख नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या निधनामुळे सभा तहकूब करण्याची मागणी भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी केली. मनसेच्या सुजाता डेरे यांनी सभा तहकूब करण्याविषयीची निर्णय प्रणाली ठरवावी, अशी सूचना केली. विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी मागील सभेचा पायंडा कायम ठेवत सभा घेण्याची मागणी केली. रिपाइंचे प्रकाश लोंढे यांनी वारंवार सभा तहकूब होत असल्याने शहरातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयांवर चर्चा होत नसल्याने सभा घेण्याची मागणी केली. परंतु सदस्यांच्या मागणीची दखल न घेता महापौरांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. सभा तहकूब झाल्याने निराश झालेल्या दिनकररावांनी आता पुढील सभेत मागण्या मांडण्याचे ठरविले आहे.
सभा तहकुबीमुळे दिनकर पाटील यांची निराशा
पालिकेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या चौकशीसह इतर अनेक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी सभागृहातच आंदोलन करण्याचे ठरवून गुरूवारी आगमन केले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-11-2012 at 01:04 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meeting cancelled