मांढरदेव येथील काळेश्वरी देवीची यात्रा २७ जानेवारी २०१३ रोजी भरत असून यात्रेच्या निमित्ताने मांढरदेव येथील ग्रामसभा व मांढरदेव देवस्थान ट्रस्टची बैठक झाली. दरवर्षी यत्रा पौष पौर्णिमेस भरते. यावर्षीची पौर्णिमा २७ जानेवारीस आहे.
येथील विश्रांतिगृहात ट्रस्टने अध्यक्ष तथा जिल्हा व सत्रन्यायाधीश पी. पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी प्रशासकीय विश्वस्त तहसीलदार सुनील चंदनशिवे, प्रांताधिकारी सूरज वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर धस यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते.
२६ ते २८ जानेवारी २०१३ या तीन दिवसांत यात्रेत मुख्य कार्यक्रम आहे. २६ रोजी रात्री देवीचा जागर होणार आहे. याच रात्री देवीचा छबिना गावात होईल. त्यानंतर पौषपौर्णिमेस २७ जानेवारी रोजी देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे विधीवत महापूजा होईल. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन उपलब्ध होणार आहे.
मांढरदेव देवस्थान ट्रस्टने महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटकातून आलेल्या भाविकांच्या दृष्टीने शासकीय खात्यांच्या मदतीने यात्रा पार पाडण्याचे नियोजन केले आहे. यादृष्टीने या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान मांढरदेव येथील ग्रामपंचायतीनेही गावपातळीवरील यात्रा नियोजनासाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते. सरपंच काळूराम क्षीरसागर (गुरव) यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या सभेत यात्रेसाठी गावाने मोठे नियोजन केले आहे.

Story img Loader