आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तसेच मान्सूनपूर्व तयारीसाठी जिल्ह्यातील सर्व विभागांनी आपापला आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून १९ मे रोजी होणाऱ्या बैठकीत सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी सिंहस्थ कुंभमेळा तसेच मान्सूनपूर्व तयारीच्या पाश्र्वभूमीवर करावयाचे आपत्ती व्यवस्थापन या मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी महापालिका व पाटबंधारे विभागाने सतर्क राहणे आवश्यक असल्याचे सूचित करण्यात आले.
बैठकीस पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, उपजिल्हाधिकारी सिंहस्थ मेळा कक्ष महेश पाटील यांच्यासह महापालिका अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागाचा आराखडा तयार करून नियोजन करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या निर्देशानुसार आपापल्या आराखडय़ात सर्व बाबींचा समावेश करणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ, साधनसामग्री, त्या अनुषंगाने करावयाच्या इतर बाबींचे नियोजन करून आपत्ती घडल्यानंतर करावयाची कृती आदींचा त्यात अंतर्भाव गरजेचा आहे.
पोलीस आयुक्त सरंगल यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा कसा असावा, याबद्दल मार्गदर्शन केले. या आराखडय़ात आपत्ती घडल्यानंतर नेमकी काय कार्यवाही करावी, याविषयी सविस्तर माहिती नमूद करावी, असेही त्यांनी सांगितले. बैठकीस आरोग्य, वीज कंपनी, सार्वजनिक बांधकाम, परिवहन महामंडळ, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर १९ मे रोजी पुन्हा एकदा संयुक्त बैठक होणार आहे. त्या वेळी सर्व विभागांनी या संदर्भातील नियोजन सादर करण्याची सूचना करण्यात आली.

Story img Loader