चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या विस्तारित एक हजार मेगाव्ॉटच्या नवीन संचाच्या वीज वाहिनीच्या तारा चंद्रपूर-परळी या ४०० के.व्ही. च्या अतिउच्चदाब वीजवाहिनीला जोडण्याच्या कामासाठी २४ फेब्रुवारीला बारा तासांचा ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात आल्याने रविवारी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्य़ातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे. या मेगा ब्लॉकचा सर्वाधिक फटका उद्योग क्षेत्राला बसणार आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात एक हजार मेगाव्ॉटच्या विस्तारित प्रकल्पाचे काम सुरू आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या नियोजित वेळापत्रकानुसार डिसेंबर २०१२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक होते, परंतु अतिशय कासवगतीने काम सुरू असल्याने २०१३-१४ पर्यंत विस्तारित प्रकल्प पूर्ण होईल, असे वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही वस्तुस्थिती असली तरी नवीन संचाच्या वीज वाहिनीच्या तारा चंद्रपूर-परळी या ४०० के.व्ही.च्या अतिउच्चदाब वीज वाहिनीला जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठीच रविवार २४ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक घेण्यात आला असून चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्य़ातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे. चंद्रपूर-परळी या वीज वाहिनीवर अवलंबित सर्व २२० केव्ही., ६६ के.व्ही., ३३ के.व्ही. वीज वाहिन्यांवर सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होणार आहे.
हे काम महापारेषण कंपनीचे असले तरी या वीजवाहिनीवर महावितरण कंपनीच्या वीजवाहिन्यांना पुरवठा होत असतो. त्यामुळे महावितरणच्या ग्राहकांचा वीज पुरवठा यावेळी खंडित असणार आहे. हे काम लाईन टू लाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. ४०० के.व्ही. चंद्रपूर-परळी लाईनवर सर्किट १ व सर्किट २, तसेच २२० के.व्ही.डबल सर्किट जी.सी.आर. गडचांदूर सर्किंट १ व सर्किट २, एमआयडीसी व ६६ के.व्ही. जी.सी.आर.टी.पी.एस. लाईनवर हे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वीजवाहिनीवरील २२० के.व्ही. एमआयडीसी, चंद्रपूर, २२० के.व्ही. गडचांदूर, २२० के.व्ही. म्हातारदेवी, २२० के.व्ही. विरूर, गडचिरोली १३२ के.व्ही., १३२ के.व्ही. आष्टी, १३२ के.व्ही. मूल, १३२ के.व्ही. सिंदेवाही व २२० के.व्ही.जीईपीएल, १३२ के.व्ही. बिल्ट आष्टी, २२० के.व्ही.सिध्दबली, २२० के.व्ही. वायूनंदन गडचिरोली, ग्रेटा एनर्जी मूल व लायड मेटल्स या सर्व उपकेंद्रांना व चंद्रपूर-गडचिरोलीमधील सर्व ३३ के.व्ही. उपकेंद्रांना होणारा वीज पुरवठा सकाळी सहा ते सायंकाळी सहा दरम्यान बंद राहणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहक, अशा सर्व वीज ग्राहकांना या काळात वीज पुरवठा होणार नाही. एकटय़ा चंद्रपूर जिल्ह्य़ात केवळ वरोरा शहर वगळता चंद्रपूर शहर, एमआयडीसी, घुग्घुस, मूल, चिरोली, चिचपल्ली, बल्लारपूर, गडचांदूर, कळमना, विरूर, गोंडपिंपरी, राजूरा, कोरपना, पोंभूर्णा, जिवती या सर्व तालुक्यातील गावांचा, तर गडचिरोली जिल्ह्य़ात गडचिरोली शहर व ब्रम्हपुरी शहर वगळता आलापल्ली, एटापल्ली, चामोर्शी, सिरोंचा, देलनवाडी, आरमोरी, धानोरा, वडसा, कुरखेडा या सर्व भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे.
हे काम सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करणार असल्याचे महापारेषणने सांगितले असले तरी गेल्या वर्षी अशाच मेगा ब्लॉकमुळे, या तसेच गडचिरोली जिल्ह्य़ातील वीज पुरवठा सलग चोवीस तास खंडित झाला होता. तोच प्रकारच आताही होऊ नये म्हणून महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या मेगा ब्लॉकचा सर्वाधिक फटका मोठय़ा उद्योगांसोबतच शहरातील छोटय़ा-मोठय़ा उद्योगांनाही बसणार आहे.
१२ तास वीज पुरवठा खंडित, उद्योगांना बसणार सर्वाधिक फटका
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या विस्तारित एक हजार मेगाव्ॉटच्या नवीन संचाच्या वीज वाहिनीच्या तारा चंद्रपूर-परळी या ४०० के.व्ही. च्या अतिउच्चदाब वीजवाहिनीला जोडण्याच्या कामासाठी २४ फेब्रुवारीला बारा तासांचा ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात आल्याने रविवारी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्य़ातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे. या मेगा ब्लॉकचा सर्वाधिक फटका उद्योग क्षेत्राला बसणार आहे.
First published on: 23-02-2013 at 03:51 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mega block is on tommarow in chandrapur gadchiroli