वर्धा लोकसभा मतदारसंघातील सर्व गावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
आगामी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार सागर मेघे यांनी नामवंत संगीतकार व चित्रपट अभिनेत्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करीत दिवाळीपूर्वीच मनोरंजनाचा डबल धमाका उडवून दिला आहे. लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात येत्या आठवडय़ात मेघे समूहातर्फे मनोरंजनाची आतषबाजी होणार असून या निमित्ताने प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा मेघे गटाचा व्यूह आहे.
१८ ऑक्टोबरला कोजागरीला मेघे अभिमत विद्यापीठात गायक रमेश ठाकरे यांचा वऱ्हाडी झटका हा मनोरंजनात्मक प्रबोधनपर कार्यक्रम आहे. २० ऑक्टोबरला आर्वीच्या राजीव गांधी सभागृहात महिला बचत गटाचा मेळावा असून याप्रसंगी अभिनेत्री निशिगंधा वाड या मुख्य आकर्षण राहणार आहेत. महिला व बालविकास मंत्री प्रा. वर्षां गायकवाड, पालकमंत्री राजेंद्र मुळक, अमर काळे यांची हजेरी लागणार असून अध्यक्षस्थानी खासदार दत्ता मेघे राहतील. मेळाव्यासोबतच दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन असून वस्तूनिर्मिती, बाजारपेठ व वितरण याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. या मेळाव्यास अखिल भारतीय काँॅगेस समितीच्या सचिव खासदार मीनाक्षी नटराजन यांचे प्रमुख मार्गदर्शनपर भाषण होणार आहे. खासदार नटराजन या पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जातात.
सागर मेघेंच्या स्पर्धक चारुलता टोकस यांनी सेवाग्रामच्या महिला मेळाव्यात दिल्लीस्थित बडय़ा महिला नेत्यांना बोलावले होते. त्यास चोख प्रत्युत्तर म्हणून मेघे गटाने नटराजन यांची उपस्थिती पक्की केल्याचे म्हटले जाते. याच महिला मेळाव्यात दिवाळीपर्वानिमित्त पूरक वस्तू व खाद्यांचे स्टॉल्स लागतील. समारोपप्रसंगी लकी ड्रॉद्वारे बचत गटांना विविध वस्तूंची भेट दिली जाणार असून त्यानंतर सुप्रसिद्ध संगीतकार रवींद्र जैन व चमूचा सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे. महिला मेळाव्याची विशेष बाब म्हणजे सागर मेघेंच्या पत्नी देविका मेघे या प्रथमच जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. समन्वयक मयूरा अमर काळे, मनीषा मेघे व संगीता इंगळे आयोजक आहेत.
काँग्रेस सेवादलाच्या सहकार्याने मेघे फोंऊडेशनने ३१ ऑक्टोबरला हिंगणघाट येथे शिर्डी के साईबाबा या महानाटय़ाचे आयोजन केले आहे. आसावरी तिडके निर्मित हे महानाटय़ अडीचशे कलाकारांसह पाच हजार चौरस फुटांच्या दोनमजली रंगमंचावर सादर होईल. नयनरम्य प्रकाश योजनेसह गीत व नृत्यांचा अप्रतिम आविष्कार असणाऱ्या या महानाटय़ाचा आनंद घेण्यासाठी सात हजारांवर रसिक बसू शकतील अशा बैठक व्यवस्थेचे आयोजन केले जात आहे. यानंतर ११ ते १५ नोव्हेंबरला बालदिनानिमित्ताने ‘बच्चो के बापू’ या उपक्रमांतर्गत बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धा क्रीडा संकुलात होणाऱ्या या पाच दिवसीय महोत्सवाची संकल्पना सुपरिचित गांधीवादी व राष्ट्रीय युवा योजनेचे संस्थापक एस.एन. सुब्बाराव यांनी तयार केली आहे. ८ ते १२ वयोगटातील जिल्ह्य़ातील मुले तसेच भारतभरातून पाचशे व मित्रराष्ट्रातून शंभर पालकांचा सहभाग यात अपेक्षित आहे. बालकांच्या मुक्त छंदाचा विकास व गांधी विचारांची पखरण करण्याचा यामागे हेतू असल्याचे आयोजकांनी नमूद केले. हस्तकला, मुद्राचित्र, कोलाज, मातीकाम, कठपुतली, संगीत वादन, काष्ठशिल्प, वस्त्रचित्रे, संगणक साक्षरता व अन्य उपक्रम आयोजित असून सर्व राज्यांतील मुलांच्या सांस्कृ तिक कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. महोत्सवात सहभागी सर्व बालकोंना गांधीजींचा पदस्पर्श लाभलेल्या व अन्य स्थळांच्या भेटीला नेण्यात येणार आहे. जिल्ह्य़ाबाहेरून येणाऱ्या बाल पाहुण्यांची व्यवस्था जिल्ह्य़ातून सहभागी होणाऱ्या बालकांच्या घरी करण्याची कल्पना आहे. स्थानिक पालकांवर त्याची जबाबदारी राहील, असे मेघे फोंऊडेशनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतात प्रथमच अशा स्वरूपाचा हा महोत्सव असल्याचा दावा सागर मेघे यांनी या अनुषंगाने बोलताना केला. आर्वीचा महिला मेळावा हा गृहिणींना दिवाळीपूर्व नावीन्यपूर्ण भेट होय, असेही त्यांनी नमूद केले. मेघे फोंऊडेशन नेहमीच असे उपक्रम आजवर राबवीत आले असून त्याचा निवडणुकीशी संबंध नाही, असा खुलासाही त्यांनी केला. महिला व बालकांचे पालक तसेच रसिक श्रोत्यांना लक्ष्य करणारे हे कार्यक्रम आहेत. यासर्व कार्यक्रमानिमित्ताने मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा पद्धतशीर प्रयत्न मेघे समूहाने केला आहे. कार्यक्रम आयोजनाची सूत्रे काही अंशी स्थानिक नेत्यांकडे असली तरी पडद्यामागे सर्व हाताळणी सागर मेघेंचा कोअर ग्रुप करीत असल्याचे दिसून येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा