रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, दोन्ही बाजूच्या खचलेल्या कडा, वळण रस्त्यावर वाढलेली झाडे, यासह इतर कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून मेहकर-सुलतानपूर या राज्य महामार्गाची अतिशय दूरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे गेल्या वर्षांत या रस्त्यावर झालेल्या विविध अपघातांमध्ये १३ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर २० प्रवासी जायबंदी झाले आहेत.
या रस्त्यावर सतत अपघात होत असतांनाही सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवून वळण रस्त्यावरील झाडे तोडण्यात यावी, अशी मागणी होत आहे. नागपूर-औरंगाबाद हा राज्य महामार्ग सुलतानपूरवरून जातो. या महामार्गावर रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. मेहकर-सुलतानपूर या अकरा किलोमीटरच्या अंतरावर पाच धोक्याची वळणे आहेत. त्यात सांगपूर, चिंचोली बोरे, झोरगणी या वळणांचा समावेश आहे. त्यापैकी चिंचोली बोरे येथील वळण अतिशय धोकादायक आहे. तशातच या वळणावर मोठमोठी बाभळीची झाडे व जाळ्या वाढल्यामुळे वाहनचालकांना समोरील वाहन दिसत नाही. त्यामुळे सर्वाधिक अपघात या वळणावर होत आहेत. गेल्या वर्षी याच वळणावर दोन लक्झरी बसेस पेटून त्यात १९ प्रवाशांचा कोळसा झाला होता. तेव्हापासून या मार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.
रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, दोन्ही बाजूच्या खचलेल्या कडा, वळण रस्त्यावर वाढलेली बाभळीची झाडे यासह इतर कारणांमुळे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात येते. त्यानंतर मात्र काही दिवसातच हा रस्ता जैसे थे होत आहे.
या रस्त्यांवर चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे, तसेच रस्त्याच्या मधोमध असलेले पांढरे पट्टेही दिसत नाहीत. परिणामी, या महामार्गावर दर तिसऱ्या ते चवथ्या दिवशी अपघात होत आहेत. विशेष म्हणजे, या रस्त्यावर कुठेच गतिरोधकही नाही. अपघात झाला की त्याची मागणी होते, परंतु याकडे बांधकाम विभाग सतत दुर्लक्ष करीत आहे. या अपघाताला आळा घालण्यासाठी वळण रत्यावर गतिरोधक बसवून वाढलेली काटेरी झाडे तोडणे गरजेचे आहे.
या महामार्गावर गेल्या एक वर्षभरात झालेल्या अपघातात १३ ठार, तर २० जण गंभीर जखमी झाले. काही दिवसांपूर्वीच काळी पिवळी टॅक्सीच्या अपघातात ४, तर दुचाकीच्या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, या रस्त्यावर दुचाकीच्या अपघाताची संख्या जास्त आहे. शहरापासून अवघ्या काही अंतरावरील सीता नान्ही नदीच्या पुलावर अद्याप क ठडे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भविष्यात या पुलावरून वाहन नदीत पडून भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा