जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या प्रमाणेच अगस्ती सहकारी साखर कारखानाही उसासाठी पहिली उचल देईल असे आश्वासन कारखान्याच्या वतीने देण्यात आल्यानंतर विविध संघटनांनी ऊस भावासाठी सुरु केलेले उपोषण स्थगित करण्यात आले. आजच हा भाव जाहीर करण्याचे कारखान्याने मान्य केले आहे.
राज्यात कोल्हापूर विभागातील कारखान्यांनी उसाला पहिली उचल अडीच हजार रुपये देण्याची घोषणा केली, मात्र विखे कारखाना वगळता अगस्ती कारखान्यासह जिल्ह्यातील एकाही कारखान्याने पहिली उचल किती देणार हे जाहीर केले नाही. त्याविरोधात आत्मक्लेशासाठी मार्क्‍सवादी किसान सभा, शेतकरी संघटना, मराठा महासंघ, जनता दल (सेक्युलर) आदी संघटनांच्या वतीने आजपासून उपोषण करण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली.
उपोषण सुरु केल्यावर काही वेळातच अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, संचालक परबत नाईकवाडी, राजेंद्र डावरे, कचरु शेटे आंदोलनस्थळी आले व त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर याप्रश्नी चर्चा केली. जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनी दिलेल्या पहिल्या उचलीपेक्षा अगस्ती कारखाना एक रुपयाही कमी देणार नाही.
त्यांच्या बरोबरीनेच उचल देऊ तसेच पुर्वी जाहीर केल्याप्रमाणे मागील गळीताचे ५० रुपये प्रमाणे पेमेंट आठवडाभरात वर्ग करु, संचालक मंडळाच्या आजच्याच बैठकीत पहिली उचल किती देणार याबाबतची घोषणा करु असे ठोस आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले.
डॉ. अजित नवले, शरद देशमुख, अशोक आरोटे, भाऊसाहेब वाक्चौरे, ओम काळे, चंद्रभान भोत आदींनी आंदोलकांच्या वतीने चर्चेत भाग घेतला. अगस्ती कारखान्याकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुरेश भोर, बाळासाहेब वाळुंज, भाऊसाहेब साबळे, गणेश गुंजाळ आदी कार्यकर्ते आत्मक्लेशासाठी उपोषणास बसले होते. श्री. गायकर यांचेहस्ते िलबुपाणी देऊन कार्यकर्त्यांनी उपोषण सोडले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा