आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिकदृष्टय़ा सुदृढ राहण्यासाठी अनेकांची पाऊले जिमकडे वळत आहेत. नामांकित जिम म्हणून बोरिवलीत विश्वासाने लोकांनी हजारो रुपये भरून ‘तळवलकर्स फिटनेस सोल्यूशन’मध्ये प्रवेश घेतला. मात्र शाखा दुसरीकडे वळवण्याचे कारण सांगत जिम बंद करण्यात आली. ना दुसरी शाखा सुरू झाली ना पैसे परत मिळाले. आता आपले पैसे परत मिळवण्यासाठी हेलपाटे घालण्याची वेळ जवळपास १३० जणांवर आली आहे. त्यांचे २१ लाख रुपये ‘तळवलकर्स’कडे अडकले असून आठ महिने झाले तरी पैसे परत मिळत नाहीत व पोलीसही कारवाई करत नसल्याने दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
हे बहुतांश सदस्य बोरिवलीच्या अशोक नगर येथील वझिरा येथील तळवलकर्स व्यायामशाळेचे आहेत. ही शाखा एप्रिल, २०१४ रोजी अचानक बंद करण्यात आली. सुमारे वर्षभराचे शुल्क आगाऊ भरलेल्या सुमारे १३० सदस्यांना हा धक्काच होता. कारण, २० ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान वर्षभराचे म्हणून शुल्क अनेक सदस्यांनी व्यायामशाळेकडे भरले होते. या सर्व सदस्यांना मिळून तब्बल २१ लाख रुपये व्यवस्थापनाला देणे आहे. आम्ही ही शाखा बोरिवलीतच अन्यत्र हलवीत असल्याचे कारण त्या वेळी देण्यात आले. मात्र, बरेच दिवस उलटल्यानंतरही दुसरी व्यायामशाळा सुरू होण्याचा काहीच पत्ता नसल्याने सदस्यांनी बोरिवलीच्या एमएचबी पोलीस ठाण्यात व्यायामशाळेच्या मालकांविरोधात तक्रार केली.
हे प्रकरण पोलिसांकडे गेल्याने व्यायामशाळेचे चालक राहुल तळवलकर यांनी एमएचबीच्या पोलिस निरीक्षकांकडे लेखी हमीपत्र दिले. जे सभासद मागणी करतील त्यांना त्यांचे पैसे ८ जून २०१४ पर्यंत परत करू, असे त्यात तळवळकर यांनी लिहून दिले. मात्र, अद्यापही सदस्यांना आपले पैसे परत मिळालेले नाहीत. व्यायामशाळेचे चालक राहुल आणि अंबर तळवलकर यांचे भ्रमणध्वनीही आता लागत नाहीत, अशी तक्रार सुनील भानुशाली यांनी केली. भानुशाली यांनी आपल्या दोन मुलांसाठी म्हणून या व्यायामशाळेत ४५ हजार रुपये भरले होते. येथील सर्व फसविल्या गेलेल्या सदस्यांनी मिळून तळवलकर्स वझिरा मेंबर्स असोसिएशनच्या माध्यमातून आता पोलिसांकडे या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला आहे.
या व्यायामशाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतनही थकले आहे. याशिवाय जागेचे भाडे आणि पाण्याची देयकेही थकले असल्याची तक्रार त्यांनी केली. ‘पैसे परत देऊ असे आश्वासन दिल्यामुळे आम्ही अद्याप मालकांविरोधात कारवाई केलेली नाही. परंतु, आता आम्हाला कठोर कारवाई करावी लागेल,’ असे एमएचबी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी सांगितले. या संदर्भात एफआयआर दाखल करण्याची शिफारस मी वरिष्ठांकडे केली आहे. त्यांच्याकडून मान्यता आल्यानंतर आम्ही तक्रार दाखल करू, असे सरकारी उत्तर त्यांनी दिले. या प्रकरणी राहुल आणि अंबर तळवलकर यांना वारंवार प्रयत्न करूनही त्यांचे भ्रमणध्वनी लागत नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा