छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट तसेच फोर्ट परिसरातील रस्ते आणि पदपथांवर अन्य फेरीवाल्यांबरोबरच मोबाइलमध्ये वापरण्यात येणाऱ्या मेमरी कार्ड विक्रेत्यांनीही आपले बस्तान बसवले आहे. अत्यंत स्वस्तात मिळत असलेल्या या मेमरी कार्डना चांगली मागणीही आहे. मात्र, मेमरी कार्डचा दर्जा/गुणवत्ता यावर कसलेच नियंत्रण नसल्याने काही वेळेस पस्ताविण्याची वेळ येत आहे.
मान्यताप्राप्त दुकानांमधून मायक्रोएसडी मेमरी कार्ड खरेदी केले तर त्याची एक वर्षांपर्यंत हमी मिळते. पण त्याच्या किंमती रस्त्यावर मिळणाऱ्या कार्डपेक्षा कितीतरी जास्त असतात. त्यामुळे अनेकजण रस्ते आणि पदपथावर मिळणारी स्वस्त मेमरी कार्ड घेतात. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाहेर, रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात सध्या याची विक्री मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. २ ते ८ जीबी क्षमतेची ही मेमरी कार्ड काही विक्रेत्यांकडे अवघ्या ३० ते ८० रुपयांपर्यंत मिळत आहेत. मेमरी कार्ड तयार करणाऱ्या काही नामांकित कंपन्यांच्या नावात थोडाफार फरक करून ही कार्डे विकली जात आहेत. तर काही स्थानिक कंपन्यांकडूनही मेमरी कार्ड तयार करून २०० ते ४०० रुपये अशा किमतीत विकली जात आहेत. ही मेमरी कार्ड विकणाऱ्या विक्रेत्यांकडून त्यात गाणीही डाऊनलोड करून दिली जात आहेत. मेमरी कार्ड विकत घेताना विक्रेत्यांकडून याची कोणतीही हमी नसल्याचे तसेच हा माल गोदीचा असल्याचे सांगितले जाते.
कमी किंमतीत जास्त क्षमतेचे मेमरी कार्ड मिळत असल्याने अनेकजण ही कार्डे खरेदी करत आहेत. कार्ड जितके दिवस व्यवस्थित चालेले तितके दिवस वापरू. नंतरचे नंतर पाहू, असा विचार करून ते या मायाजालात अडकत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा