शैक्षणिकदृष्टय़ा अनेक संवेदनशील कामे दररोज हाताळणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या आवारातील सुरक्षा रक्षकांची मंजूर पदे कमी करून संपूर्ण व्यवस्थाच खासगी सुरक्षा कंत्राटदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे, विद्यापीठाच्या आवारातील सुरक्षा व्यवस्था येत्या काळात टांगणीला लागण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या एका आदेशाचा दाखला देत विद्यापीठातील निवृत्त सुरक्षा रक्षकांची पदे ‘हमाल’ (शिपाई) या संवर्गात रूपांतरित करण्यात येत आहेत. यामुळे, सुरक्षा रक्षकांची पदे आपोआप कमी होतील. पदे कमी झाली की खासगी सुरक्षा कंत्राटदाराकडे विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविली की काम फत्ते. पण, यामुळे गेली अनेक वर्षे तात्पुरत्या नेमणुका स्वीकारून विद्यापीठाची सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या तोंडाला पाने पुसली जाणार आहे.
प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे गठ्ठे अशी अनेक संवेदनशील बाबी विद्यापीठला सांभाळाव्या लागतात. या शिवाय विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधली मोकळी जागा अतिक्रमणापासून वाचविणे, समाजकंटकांना आवारात येण्यापासून रोखणे, आणीबाणीच्या परिस्थितीचा मुकाबला करणे आदी कामांसाठी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांना सजग राहावे लागते. विद्यापीठाची फोर्टमधील इमारत हेरिटेज आहे. त्यामुळे, तिथेही विद्यापीठाला २४ तास सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवावी लागते. पण, गेली अनेक वर्षे विद्यापीठ सुरक्षा रक्षकांच्या तात्पुरत्या नेमणुका करून वेळ भागवून नेत आहे.
विद्यापीठात सुरक्षा रक्षकांची १५३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ११८ सुरक्षा रक्षकांच्या नियुक्त्या वर्षांनुवर्षे तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत आहेत.
‘सुरक्षा रक्षकांची गरज ही कधीच कमी होणारी नाही. मग या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कायमस्वरूपी करण्यात काय अडचण आहे,’ असा सवाल युवा सेनेचे कार्यकर्ते आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप करंडे यांनी केला.
तात्पुरत्या सेवेत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कायम करण्यात यावे, या करंडे यांच्या मागणीवरून विद्यापीठाने प्रा. एन. एम. राजाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने या सर्व कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये पगारवाढ देण्याची सूचना केली. त्यानुसार या कर्मचाऱ्यांचे वेतन पाच वरून सात हजार रुपयांवर जाईल. पण, त्यांना सेवेत कायम करण्याची सूचना कुलगुरूंनी फेटाळून लावली आहे. त्यावर हे सर्व कर्मचारी मराठी असून त्यांच्या तोंडातला घास हिरावून विद्यापीठ खासगी यंत्रणेकडे हे काम सोपविणार असेल, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला.