देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असून ते रोखण्यासाठी समाजातील पुरुषी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत. हे कायदे अधिक कठोर झाले पाहिजेत, अशी अपेक्षा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.
सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय व सोलापूरची समाजशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या महिलांवरील अत्याचार या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार हे अध्यक्षस्थानी होते. समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक गायकवाड यांनी प्रास्ताविक तर प्राचार्य डॉ.राजीव बावधनकर यांनी स्वागत केले. या वेळी आदर्श समाजशास्त्रज्ञ म्हणून डॉ. सूर्यकांत घुगरे, समाजकार्यासाठी प्रा. विलास बेत व आदर्श कार्यकर्ता म्हणून अशोक लांबतुरे यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द.ना.धनागरे यांना आदर्श तत्त्ववेत्ता पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते उपस्थित राहू शकले नाहीत.
आमदार प्रणिती श्िंादे म्हणाल्या, महिलांना सर्व प्रथम कुटुंबात मानाचे स्थान मिळाले पाहिजे. महिला सुशिक्षित झाल्यामुळे त्या आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाल्या आहेत. परंतु त्यांना सुरक्षितता मिळाली नाही. कायदे आपल्या बाजूला आहेत, असे महिलांना वाटले पाहिजेत. शासन व पोलीस यंत्रणा महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घेतात. परंतु पुरुषी मानसिकता बदलून तिला भावनिक संरक्षण देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ.मालदार यांनी पुरुषांना घरात आई, बहीण, पत्नी असावी असे वाटते. परंतु मुलगी मात्र नकोशी वाटते. ही धारणा बदलली पाहिजे. आईची सेवा करणे हे मुलांचे कर्तव्य आहे. तसे महिलांचाही सन्मान झाला पाहिजे. ईश्वराचा अंश म्हणजे स्त्री आहे. तिचा सन्मान, आदर, सत्कार केला गेला तर समाजात वाढणारे महिला अत्याचार आपोआप थांबतील, असे विचार कुलगुरू डॉ. मालदार यांनी व्यक्त केले. या वेळी पुरस्कार मानक ऱ्यांच्या वतीने डॉ. सूर्यकांत घुगरे यांनी मनोगत मांडले.
या परिषदेच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाघमारे यांनी केले. तर प्रा. चंद्रकांत कांबळे यांनी आभार मानले. या वेळी डॉ. बी. एम. कराडे, प्रा.  प्रशांत नलावडे, प्रा. नामदेव गरड, डॉ. श्रीकांत येळेगावकर, डॉ. अशोक नवले (कर्जत), डॉ. चंद्रशेखर (शिमोगा, कर्नाटक), डॉ. बी. एम. महातो (नवी दिल्ली) यांच्यासह सुमारे २५० प्रतिनिधी उपस्थित होते. चर्चासत्रात १५७ शोधनिबंधांचे वाचन विविध दालनांमध्ये करण्यात आले. परिषद यशस्वी करण्यासाठी प्रा. मंगलमूर्ती धोकटे, डॉ. ए. ए. गदवाल, डॉ. धनराज पाटील, प्रा. विजया महाजन, प्रा. रामेश्वर मोरे, प्रा. रघुनाथ मस्के, प्रा. प्रतिमा बिराजदार, प्रा. नागोराव भुरके, प्रा. संतोष राजगुरू, प्रा.चंद्रकांत कांबळे, प्रा. सुरेश ढेरे, प्रा. राजेंद्रसिंह लोखंडे, महीपती निकम आदींनी उत्कृष्ट नियोजन केले होते.
 

Story img Loader