ठाणे मनोरुग्णालयातील डे-केअर सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांना अलीकडेच एका समारंभात त्यांनी केलेल्या कामासाठी प्रोत्साहनपर धनादेश देण्यात आले. उपसंचालक उपअधीक्षिका डॉ. संजीव कांबळे, रुग्णालय उपअधीक्षिका डॉ. देशपांडे, डॉ. कांबळे, डॉ. गोरे व मेट्रन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. रुग्णांनी बनविलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीतून झालेल्या नफ्यातून रुग्णांना प्रोत्साहनपर मोबदला देण्यात येतो.
ठाणे मनोरुग्णालयात २००८ मध्ये डे-केअरची संकल्पना अस्तित्वात आली. लायन्स आणि इनरव्हिल यांच्या मदतीने अधीक्षकांनी हा उपक्रम सुरू केला. स्मरणशक्ती विकास, सहनशक्तीचा विकास, व्यवसाय मार्गदर्शन, व्यवसाय प्रशिक्षण, मनोसामाजिक पुनर्वसन, गट-उपक्रम व भावनिक विकास ही उद्दिष्टे समोर ठेवून हे डे-केअर सेंटर सुरू झाले. २०१२ मध्ये आरोग्य सेवा संचालनालयाने राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत सर्व मनोरुग्णालयांना निधी उपलब्ध करून दिला. त्यामधून साहित्यसामग्री, मनुष्यबळ व इमारतीची पुनर्बाधणी करण्यात आली. डे-केअर सेंटरमध्ये २०० रुग्ण नोंदणी करून या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. रुग्णांच्या पुनर्वसनासाठी नेपच्यून फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. जास्तीतजास्त रुग्णांना नोकरी देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. जास्तीतजास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डॉ. शिरसाळ यांनी या वेळी केले.
महिलांचे महिलांसाठी आरोग्य शिबीर
ठाणे शहरापासून केवळ सहा किलोमीटर अंतरावर असूनही आरोग्य सेवांपासून वंचित असणाऱ्या भिवंडी तालुक्यातील अलिमघर गावी खास महिलांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. दिवा अंजुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत हे गाव येते. सर्व शिबीर महिलांनीच संचालित केले. या शिबिरामध्ये स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. मानसी गोरे, डॉ. वृषाली गौरवार, डॉ. मनीषा पोहनारकर, डॉ. वैभवी इंदुलकर यांनी आरोग्य तपासणी केली. साडेतीनशे महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला असून या वेळी कॅन्सरवरील तपासण्याही करण्यात आल्या.