नवे चांगले काही सुचत नाही म्हणून अथवा जुने चांगले ते पुन्हा ‘दाखवावे’ अशा ‘सोप्या चाली’ने म्हणा, पण ‘रिमेक’चा (अर्थात पुन:निर्मितीचा!) मार्ग स्वीकारला जात असताना काही चित्रपटांचे ‘रिमेक’ शक्यच नाही, हे त्या कलाकृतींचे आणखी एक विशेष यश ठरावे..
एच. एस. रवेल दिग्दर्शित ‘मेरे मेहबूब’देखील तसाच. १९६३ च्या या चित्रपटाला आता पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
‘मेरे मेहबूब’ पूर्णपणे मुस्लीम सामाजिक पाश्र्वभूमीवरील प्रेमकथा.
आजचा हिंदी सिनेमा एक तर शहरी धाडसी प्रेमकथा रंगवतो अथवा अनिवासी भारतीय पिढीचे प्रतिनिधित्व करतो. (हे दोन्ही नसेल तर चुंबनदृश्य, बेधुंद धाडसी प्रणय यावर भिस्त ठेवतो, उदा. राम-लीला).
‘मेरे मेहबूब’ची भाषा उर्दूमिश्रित हिंदी आहे, त्यात ‘नजाकत’ आहे, शेरोशायरी आहे. भाषेचे अद्भुत सौंदर्य त्यात ऐकायला मिळते.
आजच्या हिंदी सिनेमाने इंग्रजीमिश्रित हिंदी भाषेपर्यंत प्रगती केली आहे. शहरी जीवनशैलीतही आज प्रादेशिक भाषा, राष्ट्रीय भाषा व आंतरराष्ट्रीय भाषा यांची ‘मिलावट’ रूळली आहे. मोबाइलच्या एसएमएस माध्यमाने भाषांची बरीच मोडतोड-जोडतोड वाढवली आहे. तीच ‘जगण्याची भाषा’ होत जाताना, हिंदूी चित्रपटाकडून उर्दू प्रभुत्वाचे हिंदी कोण ऐकणार?
‘मेरे मेहबूब’ या सगळ्यापेक्षा खूप वेगळा. काहीशा योगायोगाच्या घटना, फिल्मी क्लृप्त्या यांनीच भरलेला. पण त्या काळाशी अगदी सुसंगत. म्हणून तर त्या वर्षी त्याने रौप्यमहोत्सवी यश संपादले.
महाविद्यालयात ही प्रेमकथा सुरू होते, नायकाचा (राजेंद्रकुमार) घाईघाईत एका बुरखाधारी युवतीला (साधना) धक्का लागतो. त्या नजरानजरेत त्याला फक्त तिचे डोळे दिसतात. (साधना खास करून तिच्या नेत्रपल्लवीसाठी ओळखली जाई). ‘पहिल्याच नेत्रकटाक्षा’त ते एकमेकांच्या प्रेमात पडतात, पण काही दिवस त्याला ‘ती कोण’ हे माहीत नसते, तिची मैत्रीणही (निम्मी) याच युवकाकडे आकर्षित होते, हिचे मात्र एकतर्फी प्रेम आहे. दोघी गाण्याच्या माध्यमातून आपापल्या प्रियकराचे कौतुक करतात, पण दोघींची आवड एकच आहे हे समजल्यावर दुसरीचा प्रचंड जळफळाट होतो. ‘त्या’ दोघांच्या प्रेमात बिब्बा घालण्यासाठी खलनायकाची (प्राण) कटकारस्थाने आहेत. समज-गैरसमज-रुसवा-गोडवा अशी वळणे घेत घेत ही ‘प्रेमाची गोष्ट’ खूप पुढे सरकते, त्यात सर्वात महत्त्वाची ‘भूमिका’ ठरते ती गीते (शकील बदायुनी) व संगीतकार (नौशाद) यांची! चित्रपटातील सर्वच्या सर्व नऊ गाणी श्रवणीय व पटकथा पुढे नेणारी (आज अख्ख्या चित्रपटात ‘अवघे एक गाणे’ ऐकण्याजोगे ठरणे कठीण, म्हणून एका आयटम डान्सचा तडका दाखवतात.. ‘मेरे मेहबूब’ पुन्हा साकारताना त्यात आयटम नाच ‘बसवणार’?)
गाण्याचे ‘मुखडे’ त्याच्या ‘चाली’ जिभेवर आणतात, ‘मेरे मेहबूब तुझे मेरी मुहब्बत की कसम’ (गायक- मोहम्मद रफी), ‘तेरे प्यार में दिलबर’ (लता मंगेशकर), ‘ऐ हुस्न जरा जाग तुझे इश्क बुलाये’ (रफी), ‘मेरे मेहबूब में क्या नहीं’ (लता-आशा भोसले), ‘तुमसे इझहार ए हाल कर बैठे’ (रफी), ‘जानेमन एक नजर देखले’ (लता-आशा), ‘याद में तेरी’ (लता-रफी), ‘अल्लाह बचाए नौजवानों से’ (लता) व ‘मेरे मेहबूब तुझे’ (लता) अशी ‘एकाच कलाकृतीमध्ये नऊ गाणी’ (काही वेळा यापेक्षाही जास्त) हे त्या काळाचे विशेष. अगदी रसिक प्रेक्षकही एवढी गाणी पाहायचीत यासाठी मानसिक तयारी ठेवीत (गीत-संगीत-नृत्य बहारदार असतील तर आजचा चित्रपट रसिकही हे स्वीकारील).
अलिगढ मुस्लीम विद्यापीठात यातील ‘मेरे मेहबूब’ गाण्याचे चित्रीकरण झाले. चित्रपटात गंमत-जंमत करण्यासाठी जॉनी वॉकर होताच.
पण त्या काळात ‘ज्युबिलीकुमार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्रकुमारसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा ठरला. त्याच्या यशाने त्याचे स्थान बळकट झाले. दिलीप-देव-राज या त्रिमूर्तीच्या साम्राज्यात आपले अस्तित्त्व दाखवून देण्यासाठी ‘ज्युबिलीकुमार’ला यशाचे सातत्य हवे होतेच. साधनाने एकूणच कारकिर्दीत जेमतेम बावीस-चोवीस चित्रपटांतून भूमिका साकारल्या. त्यात मेरा साया, वह कौन थी, परख, असली नकली, हम दोनों यासह ‘मेरे मेहबूब’ खूप महत्त्वाचा! पण दिग्दर्शक एच. एस. रवेल यांना ‘मेरे मेहबूब’नंतरच्या ‘संघर्षां’साठी दिलीपकुमारची नायिका म्हणून साधनाची निवड करता आली नाही. दिलीपच्या दर्जाची वैजयंतीमाला त्यात आली. पण ‘मेरे मेहबूब’सारखे यश त्यांना ‘संघर्ष’मध्ये मिळाले नाही म्हणून ते पुन्हा मुस्लीम सामाजिक अशा ‘मेहबूब की मेहंदी’कडे वळले, यात त्यांनी संगीतात (लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे ते होते) बाजी मारली तरी त्याच्या अपयशापासून राजेश खन्नाचे सुपरस्टारपद डळमळले..
एच. एस. रवेल यांचे पुत्र राहुल रवेल (बेताब, डकैत इत्यादी) व नातू रजत हेदेखील दिग्दर्शनाकडे आले, पण ‘मेरे मेहबूब’सारखे खणखणीत यश कोणालाच मिळवता आले नाही.
आजच्या ‘क्रिश ३’, ‘धूम ३’च्या चकाचक परंतु बेगडी मनोरंजन चित्रपटाच्या काळात आजच्या पिढीने होम थिएटरवर एकदा ‘मेरे मेहबूब’ अवश्य पाहावाच.. पन्नास वर्षांपूर्वीचा हिंदी सिनेमा कसा होता (थोडा संथ तरी गुंतवून टाकणारा) याचे उत्तर मिळत जाईल व काही कलाकृतींच्या रिमेक होऊ नयेत (होणारही नाहीत) हेदेखील पटेल.. सर्वकालीन श्रवणीय गीत-संगीताची अस्सल मेजवानी मिळेलच, त्याला शिळेपण येत नाही, ही तेव्हाच्या चित्रपटांची मोठीच ताकद..
मेरे मेहबूब : पन्नास वर्षांनंतरही गोडवा कायम
नवे चांगले काही सुचत नाही म्हणून अथवा जुने चांगले ते पुन्हा ‘दाखवावे’ अशा ‘सोप्या चाली’ने म्हणा, पण ‘रिमेक’चा (अर्थात पुन:निर्मितीचा!) मार्ग स्वीकारला जात
First published on: 08-12-2013 at 12:56 IST
TOPICSहिंदी गाणी
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mere maheboob after 50 years the melody remains sweet