शिक्षणाचा प्रसार, गुणवत्ता आणि सर्वसमावेशकता ही उच्च शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने आहेत. गुणवत्ता आणि उच्च ध्येय समोर ठेवून वाटचाल केली तरच यश मिळते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बुधवारी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत सोहळा झाला. यावेळी कुलसचिव डॉ. धनराज माने, परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती.
पदवी प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. यासाठी २७ दालने उघडण्यात आली. सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र स्वीकारली. समारंभात १० विद्याशाखेतील १०७ संशोधकांना पीएच.डी प्रदान करण्यात आली. यावेळी माशेलकर म्हणाले की, शिक्षण हक्क कायदा जरी अमलात आला असला तरी योग्य शिक्षण मिळते का? याचा सारासार विचार करावा लागेल. शिक्षणाचा प्रसार गुणवत्ता आणि सर्वसमावेशकता हे आव्हान आहेच. मात्र, या विद्यापीठाने गुणवत्ता हेच ध्येय समोर ठेवले असल्याने प्रगती नक्की होईल. कौशल्ये विकसित असणारी तरुण पीढीच देशासमोरचे भांडवल आहे. मात्र उच्च शिक्षणाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. राष्ट्रीय ज्ञान आयोगाने देशात दीडशे विद्यापीठे स्थापन करण्याची गरज व्यक्त केली आहे. केवळ संख्यात्मक विकास करून चालणार नाही, तर सर्वसामान्यांना परवडेल असे दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. ज्ञानाधिष्ठीत अर्थव्यवस्था हेच सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठातील मध्यवर्ती सुविधा केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले. २ कोटी ९५ लाख रुपयांची ही इमारत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा