महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर अहमदनगरमध्ये केलेल्या दगडफेकीचे पडसाद विदर्भाच्या काही भागात उमटले असून काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि मनसेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. नंदनवन परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत दोन स्टार बसेसच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, कळमेश्वर हिंगण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निषेध करीत त्याच्या पक्षाचे पोस्टर्स फाडून ते जाळले. शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा निषेध करीत होळी
केली.
नागपुरात सकाळी खरबीकडून सीताबर्डीकडे जाणारी स्टार बस नंदवनन चौकात अडवून त्यावर दगडफेक केली. रमना मारोती चौकात स्टार बस आणि बाहेरगावच्या बसेसवर दगडफेक करून काचा फोडल्या.
स्टारबस चालकाला दगडफेकीत किरकोळ मार लागला. नंदनवन पोलिसांनी या संदर्भात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, एकाही कार्यकर्त्यांला ताब्यात घेण्यात आले नव्हते. बुधवारी पहाटे गणेशपेठमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टर फाडण्यात आले तर हिंगण्यामध्ये राष्ट्रवादीच्या एका होर्डिगची होळी करण्यात आली.
कळमेश्वरमध्ये राष्ट्रवादी आणि मनसेचे कार्यकर्ते घोषणा देत समोर आल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत केल्यामुळे कुठलीही अनुचित घटनोघडली नाही. विदर्भात बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि भंडारातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केल्याची माहिती मिळाली.
राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू घसरली – हेमंत गडकरी
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भ संघटक हेमंत गडकरी म्हणाले, राज ठाकरे यांच्या राज्यात विविध भागात होत असलेल्या जाहीर सभांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद बघता राष्ट्रवादी काँग्रेसची पायाखालची वाळू घसरली आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना आणि सामान्य जनतेचे हाल होत असताना सरकार काहीच करत नाही त्यामुळे शरद पवार यांच्यावर टीका केली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गाडय़ावर दगडफेक करणे हा म्हणजे राष्ट्रवादीचा भ्याड हल्ला आहे. राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात असल्यामुळे तो हे सहन करणार नाही. वैचारिक दृष्टय़ा राष्ट्रवादी काँग्रेस भूमिका मांडवी. यापुढे राज ठाकरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मनसेचे कार्यकर्ते त्यांना मनसे स्टाईलने उत्तर देतील असा इशारा गडकरी यांनी दिला.
जशास तसे प्रत्युत्तर देऊ – अजय पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील म्हणाले, मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ आणि पोस्टर फाडण्याचे कृत्य सुरू केले असून ते त्वरित थांबविले नाही तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जशास तसे प्रत्युत्तर देतील. राज्यात धुमाकुळ घालून अशांतता निर्माण करणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची संस्कृती नाही. राज ठाकरे आणि शरद पवार यांची तुलना होऊ शकत नाही. शरद पवार यांची देशात असलेली स्वच्छ प्रतिमा आणि त्यांनी राज्यात केलेले काम बघता राज ठाकरे यांना शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही आणि केला तर तो आम्ही सहन करणार नाही. पक्षाच्या आदेशानुसार आमच्या कार्यकर्त्यांनी सध्या संयम ठेवला आहे मात्र, मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळा वेळीच रोखला नाही तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला.  

Story img Loader