पुण्यानंतर नाशिकमधील मतदार याद्यांमध्येही घोळ असल्याचे लक्षात आल्यानंतर राजकीय पक्ष व मतदार सतर्क झाले. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे जवळपास शंभर तक्रारी दाखल झाल्या आहेत. मतदार यादीत नाव नसणे यामागे दुबार किंवा स्थलांतरित ही दोन कारणे असून मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आलेल्या तक्रारींची शहानिशा करीत छापील किंवा कार्यालयीन चुकांमुळे जर मतदार यादीतील नाव गायब झाले असेल तर ते नव्याने समाविष्ट करण्यात येईल. मात्र कुठल्याही नव्या मतदाराचा यादीत समावेश होणार नसल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विलास पाटील यांनी स्पष्ट केले. मतदार याद्यातून दोन लाखांहून अधिक नावे वगळण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदानपूर्व तयारीबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. या वेळी त्यांनी मतदार याद्यांबाबत माहिती दिली. जानेवारी २०१३मध्ये मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्याबाबत शंका असल्यास नागरिकांकडून हरकती तथा तक्रारी मागविण्यात आल्या. तेव्हा राजकीय पक्षांनाही कळविण्यात आले होते. यानंतर वर्षभरात मरण पावलेले, एकापेक्षा अधिक ठिकाणी नावे असलेले किंवा मूळ पत्त्यावर राहात नसलेल्या मतदारांची चौकशी करून मतदार यादीतून नावे वगळण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले. यामध्ये दोन लाख एक हजार ४६१ स्थलांतरित, १८,५९३ दुबार, २३,०१४ मयत, ५५२ बेपत्ता असे एकूण दोन लाख ४३,६२० नावे वगळण्यात आली आहेत. मतदार याद्यांतील घोळाबद्दल शिवसेना, मनसे राजकीय पक्षांकडून कागदोपत्री केवळ ८० तक्रारी आल्या. तसेच व्यक्तिश: २० अशा एकूण १०० तक्रारी प्राप्त झाल्याचे पाटील यांनी सांगितले. या तक्रारींचे निरसन करण्यासाठी तसेच अद्ययावत याद्या तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा व मनुष्यबळ मागविण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या तक्रारींची शहानिशा करण्यात येईल. त्यात निवडणूक अधिकारी यांनी नाव वगळण्याचे आदेश न दिलेले मात्र छापील तसेच कार्यालयीन चुकांमुळे नाव नसलेल्या मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात येतील. मात्र नव्याने कुठल्याही नावाचा समावेश होणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या एकूण ५४ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात नाशिक विभागात ४५ आणि िदडोरी विभागात ९ तक्रारी आहेत. ४ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून ३ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहे. उर्वरित तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. वाहनांमध्ये पैसे सापडल्याच्या तक्रारी आल्यावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले, परंतु चौकशीअंती त्या रकमेचा निवडणुकीशी कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. नाशिक जिल्ह्यात ६७ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा ५० केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा