एरवी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून आकाशपाताळ एक करणारे शिवसेना, मनसेचे अधिसभा सदस्य (सिनेट) आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात गुरफटून गेल्याने ऐन परीक्षांच्या हंगामात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाली राहिला नसल्याचे चित्र मुंबई विद्यापीठात आहे. आता निवडणुकीची रणधुमाळी संपली असून सिनेट सदस्य आता तरी विद्यापीठात परत या, अशी मागणी परीक्षा विभागाच्या गोंधळात पिचलेले विद्यार्थी करू लागले आहेत.
बैठकव्यवस्थेचा, परीक्षेच्या तारखांचा गोंधळ, फेरपरीक्षा तोंडावर आली तरी रखडलेले पुनर्मूल्यांकनाचे निकाल, ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळेझालेले घोळ या परीक्षांविषयक गोंधळांमुळे विद्यार्थ्यांची चांगलीच फरफट होते आहे. एरवी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून कुलगुरूपर्यंत परीक्षा विभागातल्या शिपायापर्यंत प्रशासनाल धारेवर धरण्याचे काम हे सिनेट सदस्य करीत असतात. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून विद्यापीठांला दिलेल्या निवेदनाची प्रत प्रसिद्धी पत्रकासह पत्रकारांपर्यंत पोहोचविण्यात मनसे तर फारच आघाडीवर. पण, गेले तीन-चार आठवडे मनविसे या त्यांच्या विद्यार्थी संघटनेकडून प्रसिद्धीपत्रके येता होती ती त्यांच्या उमेदवारांच्या दिवसभरातील प्रचारफेऱ्यांची आणि छायाचित्रांचीच. युवा सेनेच्या आघाडीवरही सध्या हेच चित्र आहे. त्यामुळे, अनेक लहानमोठय़ा प्रश्नावरून विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारणाऱ्या अधिसभा सदस्यांची गैरहजेरी विद्यापीठात प्रकर्षांने जाणवते आहे. याबाबत एका अधिसभा सदस्याला छेडले असता त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘एरवी विद्यापीठात असलो की तुम्ही सारखे तिथेच पडलेले असता, अशी टीका आमच्यावर होते. आता पक्षाचे काम केले तर विद्यार्थी नाराज होतात,’ अशा शब्दांत त्यांनी आपली होणारी कुतरओढ मांडली.
शिवसेनेच्या युवा सेनेतर्फे व ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या ‘मनविसे’ या विद्यार्थी संघटनेतर्फे अनुक्रमे सात आणि दोन सदस्य पदवीधर मतदारसंघातून विद्यापीठाच्या अधिसभेवर आहेत. त्यापैकी दिलीप करंडे यांच्या निधनामुळे सध्या अधिसभेत युवा सेनेतर्फे सहा सदस्य कार्यरत आहेत. पण, यातले एक-दोन सदस्य वगळता उर्वरित पक्षाने सोपविलेल्या प्रचाराच्या कामात गुंतून गेले आहेत. संजय वैराळ हे युवा सेनेच्या मदतीने अधिसभेवर आले असले तरी पक्षाच्या कामात कधीच फारसा रस घेत नाहीत. तर प्रदीप सावंत यांनी आपण निवडणुकीच्या कामात असलो तरी वेळ काढून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असतो, असे सांगितले. गेल्या काही दिवसांत मार्गी लावलेल्या विद्यार्थ्यांच्या कामाची जंत्रीच त्यांनी सादर केली. युवा सेनेच्या इतर सदस्यांकडेही ठाणे, उत्तर-मध्य, दक्षिण, उत्तर अशा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पण, आता निवडणुकीच्या कामातून उसंत मिळाल्याने या सदस्यांनी विद्यापीठात परत यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होते आहे.

विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही
आमच्यासाठी विद्यापीठ आणि निवडणुका या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. निवडणुकाच्या कामात असलो तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून विद्यापीठाकडे पाठपुरावा करणे सुरूच आहे. त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडलेलो नाहीत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून परीक्षा नियंत्रक, कुलगुरू, प्र-कुलगुरूंच्या आमच्या सतत भेटीगाठी सुरू आहेत. आत्ताही एलएलबीच्या पुनर्मुल्यांकनाच्या प्रलंबित असलेल्या उत्तरपत्रिकांचा निपटारा लवकर करावा, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.
सुधाकर तांबोळी (मनविसे), अधिसभा सदस्य

अनेक घोळ निस्तरले
निवडणुका असल्याने प्रचाराचेही काम करावे लागते. पण, विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या हजेरीवरून झालेल्या अनेक घोळ गेल्या काही दिवसात आम्ही निस्तारले आहेत.
प्रदीप सावंत (युवा सेना), अधिसभा सदस्य

 

Story img Loader