नवी मुंबई आणि उरणला जोडणारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवा (एनएमएमटी) चाकरमान्यांसाठी अधिक सोयीची ठरली होती. मात्र परिवहनसेवेच्या भोंगळकारभारामुळे या सेवेचे तीनतेरा वाजले असून नादुरुस्त बसेस आणि अनियमितता यामुळे ही सेवा गॅसवर आली आहे. याबाबत परिवहन सेवेकडे वारंवार प्रवाशांनी तक्रार करूनही उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. उरण ते नवी मुंबई या वीस ते बावीस किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेच्या एनएमएमटी बसने प्रवास करण्यास प्रवासी अधिक पसंती देत आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे. अधिक प्रवासी संख्या असलेल्या या मार्गावर परिवहनने अधिक सेवा पुरवणे अपेक्षित होते. मात्र सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत आणि कामावरून परतीच्या वेळेत अनेकदा बस भररस्त्यात बंद पडण्याच्या घटना वाढवल्या असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. त्यातच सेवेच्या अनियमिततेमुळे चाकरमान्यांचे वेळेचे नियोजन चुकत असल्याने एनएमएमटीचा प्रवास नको रे असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या बसेस बंद होण्याचे मुख्य कारण म्हणजे सीएनजी असल्याचे मत एनएमएमटीचे वाहतूक नियंत्रक जयवंत कोळी यांनी दिली आहे. सायंकाळी एनएमएमटी बसेस अनियमित होण्याचे कारण त्यांनी गव्हाण फाटा व जासई नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचे दिले आहे.मात्र एनएमएमटी सातत्यानेच अशी कारणे सांगत आली असली तरी यामध्ये सुधारणा न केल्याने प्रवाशांना तासन्तास बसची वाट पाहवी लागत असल्याची माहिती एनएमएमटीने प्रवास करणारे मनोज ठाकूर यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा