लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र फलाट नाही. उपनगरीय गाडय़ांच्या कोलाहलातच मेल गाडय़ांची वाट पाहणारे प्रवासी..सामानांचा अडथळा..इंडिकेर्ट्सवर दिसणारी आणि प्रत्यक्ष गाडयांच्या डब्यांच्या स्थितीमध्ये तफावत..पाणपोई, स्वच्छतागृह नाहीत. प्रचंड गर्दीमुळे अपघाताच्या घटना..हे वर्णन कोणत्याही दुर्गम भागातील स्थानकाचे नसून ठाण्याचे आहे. ठाणेकर प्रवाशांना रोज फलाट क्रमांक ५ आणि ७ वर हा अनुभव येत आहे. संघटनांच्या माध्यमातून या अडचणींचा पाढा वाचून कंटाळलेल्या प्रवाशांची आता सहनशक्ती संपली असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्टय़ा सुरू झाल्याने पर्यटनासाठी आणि आपल्या गावांकडे निघालेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकातील प्रचंड गोंधळाला सामोरे जावे लागत असून ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ५ आणि ७ वरील गैरसोयींबरोबरीनेच रेल्वे प्रशासनाच्या गोंधळाचा तडाखा प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या उक्तीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने मात्र या प्रवाशांच्या हालअपेष्टांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली असून आपल्या मागण्या घेऊन जाणाऱ्या प्रवासी संघटनांना उडवाउडवीची उत्तरे देण्याबरोबर कोकण रेल्वेकडे जा, तर कोकण रेल्वेकडून विभागीय व्यवस्थापकांकडे धाडले जाते. त्यामुळे संतप्त प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी या गोंधळावर नियंत्रण आणण्याची मागणी केली असून वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ठाणे स्थानकातील लांबपल्ल्याच्या गाडय़ा फलाट क्रमांक ५ आणि ७ वरून सुटतात. मात्र त्याच वेळी मुंबईकडून कल्याणकडे जाणाऱ्या जलद गाडय़ासुद्धा याच फलाटावरून जातात. त्यामुळे मोठय़ा सामानासह गावी निघालेले प्रवासी आणि उपनगरीय रेल्वे प्रवासी यांची एकच गर्दी या फलाटांवर उसळते. गर्दीशी सामना करतानाच त्यांना रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचाही फटका बसतो. उदा. इंडिकेटरवर दर्शवलेली आणि प्रत्यक्षातल्या गाडीच्या डब्यांच्या स्थितीत तफावत असते. त्यामुळे सामानासह प्रवाशांना गाडीत शिरताना बरीच कसरत करावी लागते. ठाण्यातील विनायक थत्ते यांना या गोंधळाचा फटका बसल्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये या प्रकरणी स्टेशन प्रबंधकांकडे जाऊन तक्रार केली. अशा प्रकराचा सर्रास अनुभव ठाण्यातील फलाटांवर येत असल्याने प्रवाशांमध्ये मोठा संताप आहे. कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ या संस्थेच्या वतीने कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विविध मागण्या केल्या जात असून त्यात ठाणे स्थानकातून कोकणात जाणाऱ्या सर्व गाडय़ा फलाट क्रमांक ७ वर याव्यात असे प्राधान्याने नमूद केले आहे. त्यामुळे फलाट क्रमांक पाच वरील मोठा भार कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र रेल्वे प्रशासन या मागणीला कोणतेच महत्व देत नसल्याने आता आंदोलन करायचे का असे सवाल ही मंडळी विचारत आहेत. या गैरसोयी कमी आहेत म्हणून की काय सर्वाधिक प्रवासीसंख्या असणाऱ्या ठाणे स्थानकात पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

Story img Loader