सर्वशिक्षा अभियानातंर्गत शिक्षणापासून शाळाबाह्य़ मुले वंचित राहू नये यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची परिस्थिती नांदगाव तालुक्यात दिसून येत आहे.
तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. चार महिन्यांपासून अनेक शिक्षक बदलून गेले आहे. परंतु त्यांच्या जागेवर दुसरे शिक्षकच आले नसल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी पटसंख्या २० पेक्षा जास्त, त्याठिकाणी दोन शिक्षकांची आवश्यकता आहे. परंतु ५० पटसंख्या असतानाही एकच शिक्षक त्या वर्गाचा गाडा हाकताना दिसत आहे. त्यातच शाळाबाह्य़ कामे, केंद्राची बैठक अशी अनेक कामे शिक्षकांना करावी लागत आहे. त्यामुळे एका शिक्षकाची पुरती दमछाक होत आहे. केंद्राच्या बैठकीसाठी जाताना विद्यार्थ्यांकडे पाहण्यासाठी पर्यायी कोणीही नसल्याने नाईलाजाने शाळेला सुटी देणे भाग पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. क्रांतीनगर येथील एक शिक्षक बदलून गेल्याने चार महिन्यापासून तेथे शिक्षक नसल्याने शालेय समिती सदस्य व ग्रामस्थ यांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तेथील दुसऱ्या शिक्षकाने तुमच्या भावना वरिष्ठांना कळवा कुलूप ठोकू नका, अशी विनंती केल्याने ग्रामस्थांनी आपला निर्णय मागे घेतला. सोमवापर्यंत शाळेला शिक्षक न मिळाल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा शिवाजी मोकळा, कारभारी शिंदे,संदीप आयनोर, राजेश कौचाळे आदींनी गटशिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
केवळ क्रांतीनगर येथेच अशी स्थिथी आहे असे नव्हे. तालुक्यात अशा अनेक शाळा असून विद्यार्थी संख्या जास्त तर शिक्षक संख्या कमी या परिस्थितीमुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोघांवरही अन्याय होत आहे. विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने एकटा शिक्षक त्यांना न्याय देऊ शकत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अटळ आहे.
शिक्षकाला एखाद्या जरूरी कामासाठी बाहेरगावी जाणे क्रमप्राप्त ठरल्यास शाळेत शिकविण्यासाठी दुसरा शिक्षकच उपलब्ध राहात नाही. त्यामुळेही विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या सर्व परिस्थितीचा जिल्हा परिषदेने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा