सण किंवा नव्या वर्षांच्या सुरुवातीला आवर्जून पावले वळत असत ती भेटकार्डाच्या दुकानाकडे. मात्र, आता हरघडी नव्या नव्या मेसेंजर अॅप्लिकेशन्सची भर पडत असून त्याचा फटका आता भेटकार्डाच्या बाजारपेठेला बसला आहे. पूर्वी भेटकार्डाच्या माध्यमातून मिळणारे शुभेच्छा संदेश आता मेसेंजर अॅप्सच्या माध्यमातून मिळू लागला आहे. गेल्या ३ वर्षांत भेटकार्डाची विक्री जवळपास ६० टक्क्य़ांनी घटल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.
नव्या वर्षांच्या किंवा सणासुदीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटकार्डे पाठवली जायची. मात्र, आता हररोज नव्याने येणाऱ्या मेसेंजर अॅप्समुळे भेटकार्डे खरेदी करण्याकडे ओढा कमी झाला आहे. अॅप्सच्या माध्यमातून क्षणात पाठवण्यात येणारा शुभेच्छा संदेश, त्याला चित्रे, टिझर्स, स्माईल्स, गाणी, चित्रफीत यांचीही जोड यामुळे एकेकाळी भेटकार्डाच्या खरेदीत रमणारी तरुणाई आता अॅप्सवरून जरा हटके पद्धतीने शुभेच्छा कशा पाठवता येतील, याचे पर्याय शोधत आहे.
भेटकार्डाचे दुसरे मोठा ग्राहक म्हणजे व्यावसायिक. आपल्या ग्राहकांना किंवा संबंधित कंपन्या यांना व्यावसायिकांकडून यापूर्वी आवर्जून भेटकार्डे पाठवली जायची. त्यासाठी आपल्या कंपनीच्या नावाने मुद्दाम भेटकार्डे छापून घेतली जात असत. मात्र, आता त्याचे प्रमाणही कमी झाले आहे. मोबाईलवर ई-मेल पाहण्याची सुविधा असल्यामुळे आता कंपन्याही ई-मेल करणे किंवा फ्लॅश मेसेज करण्याला प्राधान्य देत आहेत. किमान २५ रुपयांचे भेटकार्ड घेण्याऐवजी मेसेंजरच्या माध्यमातून फुकट आणि शब्द मर्यादा, आकार यांचे बंधन नसलेले शुभेच्छा संदेश पाठवण्याकडे कल आहे. परिणामी भेटकार्डाच्या बाजारपेठेला आता उतरती कळा लागली आहे. गेल्या तीन वर्षांत भेटकार्डाची विक्री जवळपास ६० टक्क्य़ांनी कमी झाल्याचे विक्रत्यांनी सांगितले आहे. याबाबत आर्चिज कंपनीच्या दुकानातील विक्रेत्यांनी सांगितले, ‘‘नवे वर्षच नाही, तर वाढदिवस, व्हॅलेंटाईन डे या सगळ्याच दिवशी होणारी भेटकार्डाची विक्री घटली आहे. एसएमएसचे दर कमी झाल्यानंतरच या बाजारपेठेवर हळूहळू परिणाम होऊ लागला होता. मात्र, आता अॅप्सवर मोफत संदेश पाठवता येत असल्यामुळे त्याचा खूपच मोठा फटका बसला आहे. मात्र, असे असले तरी हाती रेखाटलेली भेटकार्डे, तुमचा आवाज ध्वनिमुद्रित करून पाठवता येणारी भेटकार्डे अशा काही नव्या प्रकारांना मागणी आहे.’’