* फेरीवाले, वाहतूक कोंडी कायम
* मुंब्रा स्थानकात विकासकामांचा रतीब
* ठाण्यात वाहतळांचा प्रश्न ऐरणीवर
रिक्षाचालकांची मनमानी, वाटेल तसे आणि मनाला येईल तिथे होणारे वाहनांचे पार्किंग, स्थानकासमोर सुरू असलेला कत्तलखाना, मासळीबाजार, जागोजागी फेरीवाले त्यामुळे नकोशी होणारी वाहतूक कोंडी आणि जागोजागी पडलेला अतिक्रमणाचा विळखा.. यामुळे प्रवाशांसाठी अक्षरश: नकोसे ठरलेल्या बदनाम अशा मुंब्रा रेल्वे स्थानकाचा ठाणे महापालिकेने एकीकडे कायापालट घडवून आणला असताना लाखो प्रवाशांच्या गर्दीच्या ठिकाणी असलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसराचे भाग्य कधी उजळणार, असा सवाल सध्या ठाणेकर प्रवासी उपस्थित करू लागले आहेत. महापालिका आयुक्त आर. ए. राजीव आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हातात हात घालून मुंब्रा रेल्वे स्थानकाचा कायापालट घडवून आणल्याचे चित्र अगदी स्पष्टपणे दिसत आहे. मुंब्रा रेल्वे स्थानक परिसर एकीकडे कात टाकत असताना ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सॅटिससारखा कोटय़वधी रुपयांचा प्रकल्प उभारूनही वाहनांची कोंडी, वाहनतळांची दुरवस्था, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, अरुंद वाटा असे चित्र अद्याप कायम असल्याने मुंब््रय़ात जे जमते ते ठाण्यात का नाही, असा संतप्त सवाल ठाणेकर उपस्थित करत आहेत.
नियोजनाच्या आघाडीवर कोसो दूर असलेल्या मुंब्रा परिसरात सध्या मोठमोठय़ा विकासकामांचा अक्षरश: रतीब टाकला जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या एका अहवालानुसार दररोज सुमारे दोन लाख प्रवास मुंब्रा रेल्वे स्थानकातून ये-जा करत असतात. अतिक्रमणे, फेरीवाले, अनधिकृत कत्तलखान्यांमुळे हा परिसर पूर्वी प्रवाशांना अक्षरश: नकोसा व्हायचा. शिवसेनेचे बंडखोर खासदार आनंद परांजपे आणि आमदार आव्हाड या दोघांनी आपला साडेतीन कोटी रुपयांचा खासदार, आमदार निधी महापालिकेस दिला आणि आयुक्त राजीव यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक या भागाचा चेहरामोहरा बदलून टाकल्याचे चित्र आता दिसत आहे. मटण, कोंबडय़ा, मासे विकणाऱ्यांची दुकाने, अतिक्रमणे, टपऱ्या येथून हटविण्यात आल्या. जवळपास ७० लहान-मोठी दुकाने या भागातून उचलण्यात आली. आयुक्त राजीव यांनी अतिक्रमण विरोधी मोहिमेत लक्ष घालून या परिसरातील सुमारे सव्वा एकरची जागा मोकळी करून घेतली. महापालिकेने पाच कोटींची भर घालून सुमारे आठ कोटी रुपयांचा सुधारणा कार्यक्रम हाती घेतला आणि मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेर सुसज्ज असे वाहनतळ उभारण्यात आले. राजीव आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मुंब्रा रेल्वे स्थानकाचा कायापालट होत असताना ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील परिस्थिती मात्र दिवसेंदिवस दयनीय होऊ लागली आहे. या भागातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलावा यासाठी महापालिकेने कोटय़वधी रुपये खर्चून सॅटिससारखा प्रकल्प उभा केला. या प्रकल्पामुळे वाहतुकीत काही प्रमाणात शिस्त आली असली तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न काही सुटलेला नाही. सॅटिस पुलावर एक बस बंद पडली की काय परिस्थिती निर्माण होते हे ठाणेकरांनी वेळोवेळी अनुभवले आहेच. मुंब््रय़ाप्रमाणे राजीव यांचा दांडपट्टा ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांविरोधातही अनेकदा चालला आहे. मात्र, फेरीवाल्यांचे उपद्रव थांबविण्यात महापालिकेस अजूनही म्हणावे तसे यश आलेले नाही. रेल्वे स्थानकाबाहेर लागूनच गावदेवी मंदिरालगत उभ्या राहिलेल्या अनधिकृत रिक्षा स्टॅडमध्ये रिक्षाचालकांच्या मनमानीचे वेगवेगळे नमुने दररोज पाहावयास मिळतात. पूर्वेकडील बाजूसही रिक्षाचालकांची अक्षरश: मनमानी सुरू असून खासगी बस वाहतूकदारांच्या स्वयंघोषित थांब्यामुळे पूर्वेतही वाहनांची मोठी कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र आहे. रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यातून मुक्त होत नसताना आता सॅटिस पुलावरही काही ठिकाणी फेरीवाल्यांचे अतिक्रमण होऊ लागले आहे. स्थानकाच्या पश्चिमेकडे असलेला वाहनतळाविषयी प्रवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. या भागातील एका राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने हे वाहनतळ सुरू आहे. ठाण्यात शिवसेनेचे तीन आमदार असताना या पक्षाचेही यावर फारसे नियंत्रण आहे, असे चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे मुंब््रय़ाचा न्याय आम्हाला का नाही, असा प्रश्न ठाणेकरांच्या मनात डोकावू लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा