दोन महिन्यांपूर्वी रिक्षांमध्ये लावण्यात आलेल्या मीटरचे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे बंदी घालण्यात आलेल्या सुपर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीवरील बंदी परिवहन विभागाने आता उठविली आहे. बाजारात आणलेल्या सर्व मीटरची पुनर्तपासणी आणि पुनप्र्रमाणीकरण केल्याचे लेखी पत्र परिवहन विभागाला या कंपनीने दिल्यामुळे त्यांच्यावरी बंदी उठविण्यात आल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले.
एप्रिल महिन्यापासून सर्व रिक्षांना इ-मीटर लावण्याची सक्ती करण्यात आल्यावर ऑगस्टपर्यंत लावण्यात आलेल्या इ-मीटरमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मीटर्स पुण्याच्या सुपर इलेक्ट्रॉनिक मीटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची होती. मात्र या मीटरमध्ये ठराविक पद्धतीने मीटर टाकल्यास पूर्वीच्या प्रवाशाचे भाडे पुढे सुरू होत असे.
अशा तक्रारी मोठय़ा प्रमाणात आल्यावर परिवहन विभागाने या मीटरच्या वापरावर बंदी घातली. १२ जुलैनंतरची उत्पादन केलेली मीटर्स पुनप्र्रमाणित करण्याचे परिवहन विभागाने स्पष्टपणे कंपनीला बजावले होते. बाजारात आणलेली सर्व मीटर्स तसेच विक्री करण्यात आलेली मीटर्स त्वरित दुरूस्त करावीत आणि त्यांचे पुनप्र्रमाणीकरण करून त्यांची पुनर्तपासणीही करावी, असे आदेश परिवहन विभागाने त्यांना दिले. तोपर्यंत या कंपनीवर बंदी घालण्यात आली.
कंपनीने दोन महिन्यात सर्व मीटर्सची पुनर्तपासणी करून तसे लेखी पत्र परिवहन विभागाला दिले. रिक्षांना लावण्यात आलेली मीटर्सही काढून त्यांची तपासणी करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. या पत्रानंतरच परिवहन विभागाने ही बंदी उठवली असून आता या कंपनीचीही कॅलिब्रेटेड मीटर्स बाजारात आणण्यात आली आहेत.

Story img Loader