सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात तब्बल एक कोटी ३१ लाख खर्च करून मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमधील महानगर रक्तपेढीच्या धर्तीवर बांधण्यात येणाऱ्या अत्याधुनिक ‘मेट्रो ब्लड बँक’ इमारतीचे काम वष्रेभरापासून अधांतरी लटकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना सहजतेने आवश्यक ते रक्त तसेच रक्तघटक उपलब्ध व्हावेत या उदात्त हेतूने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात दहा ठिकाणी मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमधील महानगर रक्तपेढीच्या धर्तीवर तांत्रिकदृष्टय़ा अत्याधुनिक व पूर्णत: संगणकीकृत अशा ‘मेट्रो ब्लड बँक’ उभारण्याचा निर्णय घेतला. जनहितार्थ घेतलेल्या या निर्णयाचा अध्यादेश ६ जानेवारी २०१२ रोजी काढून आरोग्य खात्याला तशा सूचनासुध्दा देण्यात आल्या. त्यानंतर आरोग्य खात्याने ‘मेट्रो ब्लड बँक’ उभारण्यासाठी राज्यातील पुणे, सातारा, नाशिक, ठाणे, परभणी, जळगाव, अहमदनगर व विदर्भातील अमरावती, नागपूर व चंद्रपूर अशा दहा जिल्हय़ांची निवड केली. प्रत्येक जिल्हय़ांसाठी दीड ते दोन कोटीचा निधी सुध्दा तातडीने उपलब्ध करून देण्यात आला. तसेच प्रत्येक ठिकाणी रक्त संक्रमण अधिकारी, तंत्रज्ञ व वैद्यकीय समाजसेवक ही पदे निर्माण करण्यात येणार आहे. ते भरण्याबाबत आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील इतर सर्व जिल्हय़ांमध्ये ‘मेट्रो ब्लड बँक’ इमारतीचे काम प्रगतीपथावर असताना चंद्रपूर येथे या कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्त पेढी आहे. याच रक्तपेढीच्या वर साडेतीन हजार स्वे.फीट. मध्ये ‘मेट्रो ब्लड बँक’ची ही आधुनिक इमारत उभारण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांची परवानगी दिली. त्यानुसार या ब्लड बँकेसाठी आरोग्य खात्याने एक कोटी ३१ लाखाचा निधी तातडीने दिला. या इमारतीच्या बांधकामाला तांत्रिक मंजुरी तसेच इतर सर्व प्रकारच्या मंजुरी सुध्दा प्रदान करण्यात आलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक- २ ने या इमारतीच्या बांधकामासाठी ई-टेंडरींगची प्रक्रिया सुध्दा राबविली. त्यात कंत्राटदार सदीप कोठारी यांना सदर इमारतीच्या बांधकामाचे कंत्राटसुध्दा देण्यात आले. मात्र तरीही या इमारतीचे कामाला अजून सुरुवात झाली नसल्याची माहिती जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.अनंत हजारे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
‘मेट्रो ब्लड बँक’ सुरू करण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सदर इमारतीचे बांधकाम अवघ्या तीन महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्य खात्याला दिले होते. मात्र येथे आतापर्यंत केवळ पिल्लर फोडण्याचे काम तेवढे झालेले आहे. आतापर्यंत ही इमारत बांधून पूर्ण व्हायला हवी होती. परंतु प्रत्यक्षात तसे झालेले नाही. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद सोनुने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल फोन संपर्क कक्षेच्या बाहेर दाखविण्यात आला. तर सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ चे अधिक्षक अभियंता व्ही.पी. सिंग यांना विचारणा केली असता तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आम्हाला पैसे सुध्दा मिळाले असून तीन ते चार दिवसात कामाला सुरुवात करू असे त्यांनी सांगितले.
इतका विलंब का होत आहे अशी विचारणा केली असता त्यांच्याकडे उत्तर नव्हते. तर आरोग्य खात्यातील सूत्रानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळेच मेट्रो रक्तपेढीच्या इमारतीला विलंब होत असल्याची माहिती दिली. आज ‘मेट्रो ब्लड बँक’ सुरू झाली तर त्याचा सर्वाधिक फायदा हा ग्रामीण भागातील लोकांना होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय किंवा अन्य खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या प्रत्येकाला शुध्द रक्त तातडीने मिळणे सहज शक्य होईल. तसेच एचआयव्ही, सिकलसेल यासोबतच विविध रक्तचाचण्या करता येणे शक्य होणार आहे. तेव्हा तातडीने काम सुरू करावे अशी विनंती यापूर्वीच बांधकाम विभागाला केली असल्याची माहिती डॉ.हजारे यांनी दिली.