प्रकल्प गुंडाळला  जाण्याची भीती
* आर्थिकदृष्टय़ा परवडणारा नाही
* कागदावरील प्रकल्पांना ठाणेकर कंटाळले
* लोकप्रतिनिधीही नाराज
ठाणे शहरातील नागरिकांना मोनो-मेट्रोसारख्या मोठय़ा प्रकल्पांचे गाजर दाखविणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडी) वर्षांनुवर्षे कागदावर असलेले हे प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा शक्य नाहीत, असा कांगावा आता सुरू केला आहे. ठाणे रेल्वे स्थानक -तीन हात नाका- कापूरबावडी-कासारवडवली या १०.८७ किलोमीटर अंतराच्या मार्गावर ११ स्थानकांचा मेट्रो प्रकल्प एमएमआरडीएने आखला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दोन हजार ९१ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला असून यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुंडाळण्याच्या मन:स्थितीत एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकारी आले आहेत.
ठाण्यातील वाहतूक सुसह्य़ व्हावी यासाठी गेल्या दहा वर्षांपासून मोनो-मेट्रो आणि आता ट्रामगाडय़ांची घोषणा झाली आहे. मोठमोठय़ा प्रकल्पांच्या घोषणांपलीकडे ठाणेकरांच्या पदरात प्रत्यक्षात मात्र काहीच पडत नाही, असे एकंदर चित्र आहे. मुंबई महानगराला लागूनच असलेल्या ठाणे, भिवंडी, कल्याण पट्टयातील नागरीकरणाचा वेग जबरदस्त असून तुलनेने या भागातील पायाभूत सुविधांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, अशी ओरड सातत्याने होत आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित हा सर्व परिसर येतो. एमएमआरडीए मुंबई शहरात वेगवेगळ्या विकास प्रकल्पांसाठी कोटय़वधी रुपयांचा रतीब टाकत असताना ठाणे तसेच आसपासच्या शहरांकडे ढुंकूनही पहात नाही, असे एकंदर चित्र आहे.
नवी मुंबईत नव्याने उभ्या रहाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पास नजरेपुढे ठेवून सिडकोने खारघर भागातून मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू केले आहे. या पट्टयाकडेही एमएमआरडीएचे लक्ष नाही. ठाणे शहरातील वाहतूक  व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने गेल्या १५ वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकल्पांच्या घोषणा होत आहेत. महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी तर सर्व जुने प्रकल्प बाजूला सारत शहरात ट्रामगाडय़ा धावू शकतील, असा नवा आशावाद व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात जुन्या प्रकल्पांचा इतिहास पाहाता ठाणेकर राजीव यांच्या नव्या घोषणेकडेही गांभीर्याने पाहावे का, असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. राजीव यांची ट्रामगाडय़ांची घोषणा ताजी असताना एमएमआरडीएने शहरातील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी आखलेले मोनो-मेट्रो प्रकल्पांना आर्थिक असाध्यतेचा खोडा बसण्याची चिन्हे दिसू लागल्याने ठाणेकरांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
काय होता प्रकल्प ?
ठाणे शहर तसेच घोडबंदर पट्टयाचा झपाटय़ाने होणारा विकास लक्षात घेऊन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने शहरात कोणत्या मार्गावरुन मेट्रो रेल्वे सुरू करता येईल, याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले होते. ठाणे शहरातील सुमारे १२ लाखांहून अधिक लोकसंख्येसाठी एकमेव रेल्वे स्थानक अस्तित्वात असून या भागातून घोडबंदर मार्गाकडे जाणारी मेट्रोसेवा सुरू करता येईल का, याची चाचपणी करण्यात आली होती. यासाठी महानगर विकास प्राधिकरणाने मेसर्स कन्सलटिंग इंजिनिअरींग सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमीटेड या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीने रेल्वे स्थानक, तीन हात नाका, कापूरबावडी-कासारवडवली (घोडबंदर) या मार्गावरील नियोजित मेट्रो मार्गाचा सविस्तर अहवाल नुकताच महानगर विकास प्राधिकरणास सादर केला असून यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा खर्च येईल, असा अंदाज ठरविण्यात आला आहे. सुमारे १०.८७ किलोमीटर अंतराच्या या प्रकल्पात रेल्वे स्थानकापासून घोडबंदर मार्गापर्यत ११ स्थानके निश्चित करण्यात आली आहेत.
आर्थिक अडचणींचा खोडा
 या प्रकल्पाच्या अहवालातील आर्थिक विश्लेषणानुसार प्रकल्पाचे बांधकाम तसेच त्यामधून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता हा प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा शक्य नाही, असा नवा निष्कर्ष महानगर विकास प्राधिकरणाचे काढला आहे. सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा खर्च केल्यानंतर प्रकल्पाचा खर्च वसूल करण्याइतपत क्षमता या प्रकल्पात आहे का, असा प्रश्न आता मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला पडला आहे. गेली अनेक वर्षे या प्रकल्पाच्या सुसाध्यतेविषयी काथ्याकुट केल्यानंतर हा प्रकल्प सुसाध्य नसल्याचा साक्षात्कार महानगर विकास प्राधिकरणास झाल्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधीही थक्क झाले आहेत. या प्रकल्पातील आर्थिक गणित पाहाता बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) या तत्वावरही हा प्रकल्प राबविणे शक्य नसल्याने इतर काही मार्गाने निधी उपलब्ध करता येईल का, याची चाचपणी महानगर विकास प्राधिकरणाने सुरू केली आहे.
शासनाकडून ठाणेकरांची फसवणूक
ठाणे शहरातील नागरिकांना राज्य सरकारने पूर्वीपासून सापत्नपणाची वागणूक दिली असून एमएमआरडी केवळ मोठय़ा घोषणा करते, कामाच्या नावाने मात्र बोंब आहे, अशी टीका ठाणे शहरातील शिवसेनेचे आमदार राजन विचारे यांनी वृत्तान्तशी बोलताना व्यक्त केली. घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी, मानपाडा, पातलीपाडा येथे रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येणारी उड्डाणपुलांची कामेही रडतखडत सुरू असून मोनो-मेट्रो प्रकल्पाचे गाजर दाखवून एमएमआरडीएने ठाणेकरांची फसवणूक केली आहे, असा आरोपही विचारे यांनी केला.
ठाणे शहरात ट्राम गाडय़ांचा प्रकल्प राबविण्याची घोषणा महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी केली आहे. या प्रकल्पाची आखणी करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नाही अशी टीका शिवसेनेचे ठाण्यातील आमदार एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि राजन विचारे यांनी विधानसभेत केली. ठाण्याची प्रयोगशाळा करू नका, प्रकल्प प्रत्यक्षात आणा, घोषणाबाजी आत पुरे झाली असा टोलाही या नेत्यांनी लगावला.