अपुऱ्या लोकल गाडय़ांची संख्या आणि वाढलेल्या लोकल फे ऱ्या या दुहेरी संकटात सापडलेल्या रेल्वे प्रशासनाने नव्या प्रणालीत रूपांतरित करून जुन्या ‘रेट्रो’ गाडय़ाच चालविण्यास सुरुवात केली आहे. राखाडी रंगाने रंगवलेल्या या गाडय़ांच्या डब्यांना केवळ दोनच दरवाजे असल्याने ही लोकल प्रवाशांच्या घुसमटीला कारणीभूत ठरते आहे. विशेष म्हणजे या गाडय़ांचे पंखे आणि विजेचे स्विच प्रवाशांना बंद करता येत नाहीत. तसेच या गाडय़ांचा थेट स्विच मोटरमनकडेही नसल्याने या लोकलच्या विद्युत पुरवठय़ावर कोणाचेच नियंत्रण नसल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकारामुळे रेल्वेची शेकडो व्ॉट वीज वाया जात असून कारशेडमध्ये पोहोचल्यानंतरही या गाडय़ांचे पंखे, वीजपुरवठा सुरूच राहतो. मात्र रेल्वेच्या तांत्रिक विभागाने मात्र ही वस्तुस्थिती नाकारली असून प्रवासी गोंधळ करतात, त्यामुळे वीज, पंखे बंद केले जात नसावेत, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. मुंबईत मेट्रोच्या रूपाने नव्या वेगवान आणि आरामदायी प्रवासाचे साधन उपलब्ध झाले असले तरी ठाणेकरांच्या नशिबी मात्र रटाळ रेट्रोच आहे.
उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाढणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे लोकलच्या फे ऱ्या वाढवण्याची मोठी जबाबदारी रेल्वे प्रशासनावर असून त्यासाठी मोठय़ा संख्येने गाडय़ा उपलब्ध होण्याची गरज आहे. पाच वर्षांपूर्वी सिमेन्स कंपनीच्या नव्या लोकल गाडय़ा उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या. मात्र त्यानंतर एकही नवी लोकल गाडी मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होऊ शकली नाही. जर्मन बनावटीच्या बंबार्डीयन गाडय़ांची मागणी नोंदवण्यात आली असली तरी त्या दाखल होण्यासही प्रचंड विलंब होत आहे. अशा परिस्थितीमध्ये रेल्वे प्रशासनाला जुन्या गाडय़ा सेवेतून काढून टाकण्याऐवजी पुन्हा चालवण्याची नामुष्की येऊन ठेपली होती. त्यामुळे १५०० होल्टस्च्या विद्युत पुरवठय़ावर चालणाऱ्या या जुन्या गाडय़ांना २५०० होल्ट्सच्या विद्युत पुरवठय़ावरही चालण्यासाठी रूपांतरित करण्यात आले. दिसायला जुन्या असलेल्या या गाडय़ांमध्ये तीन दरवाजांपैकी मधला एक दरवाजाही काढून टाकण्यात आला. त्यामुळे या गाडय़ा काहीशा कोंदट बनल्या होत्या. या गाडय़ा मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावर चालवण्यास सुरुवात करण्यात आली असली तरी या गाडय़ांमधील तांत्रिक दोष कायम आहेत. या गाडय़ांमध्ये आवश्यक बॅटरीज उपलब्ध नाहीत. शिवाय गाडय़ांचा विद्युत पुरवठा आणि पंखे बंद अथवा सुरू करण्याची कोणतीही व्यवस्था या ‘रेट्रो’ ट्रेन्समध्ये नाही. त्यामुळे कारशेडमध्ये उभ्या असलेल्या या गाडय़ांचा विद्युत पुरवठा चालू राहून अनेकपट वीज वाया जात आहे. नव्या लोकल आणल्याशिवाय ही उधळपट्टी थांबू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या नव्या लोकल गाडय़ा लवकर आणाव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांच्या वतीने केली जाते आहे. ‘रेट्रो’ लोकल म्हणजे काय?
उपनगरीय रेल्वेसाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) आणि जोसेफ या कंपन्यांनी या गाडय़ांची निर्मिती केली होती. १५०० होल्ट्सच्या (डीसी) विद्युत पुरवठय़ावर या गाडय़ा चालवल्या जात होत्या. कालांतराने नव्याने दाखल झालेल्या गाडय़ा चालविण्यासाठी २५०० होल्ट्सचा (एसी) विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे जुन्या गाडय़ा कालबाह्य़ ठरल्या. वाढलेली गर्दी आणि अपुऱ्या गाडय़ांच्या संख्येमुळे या जुन्या गाडय़ा बंद न करता त्यांचे क्षमता वाढवण्यात आली. त्या गाडय़ांमध्ये १५०० होल्टेज (डीसी) आणि २५०० होल्ट्स (एसी) विद्युत पुरवठा अशा दोन्ही विद्युत पुरवठय़ावर चालवण्यासाठी आवश्यक बदल करण्यात आले. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावर या जुन्या ‘रेट्रो’ गाडय़ा चालवल्या जात आहेत.

Story img Loader