मुंबईकरांना वातानुकूलित प्रवासाचा आनंद देणारी मोनोरेल आता प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेली असताना आतापर्यंत आठ मुहूर्त हुकलेल्या वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेची स्थानके अजूनही बांधून पूर्ण झालेली नाहीत. अद्यापही स्थानकांचे पाच टक्के काम होणे बाकीच आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी मोनोरेल सुरू झालेली असताना आता मेट्रोला बहुधा विधानसभा निवडणुकीचा मुहूर्तच लागण्याची चिन्हे आहेत.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो रेल्वे मार्गाची एकूण लांबी ११.४० किलोमीटर आहे. या प्रकल्पाचा खर्च २३५६ कोटी रुपये गृहीत धरण्यात आला होता. काम बराच काळ रेंगाळल्याने प्रकल्पाचा खर्चही सुधारित अंदाजानुसार तो ४८०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे.डिसेंबर २०१३ अखेर मेट्रो रेल्वेच्या १२ स्थानकांपैकी एकाही स्थानकाचे काम १०० टक्के पूर्ण झालेले नाही. घाटकोपर मेट्रो स्थानकाचे काम ९० टक्के झाले आहे. तर इतरही स्थानकांची अवस्था जवळपास अशीच आहे. सर्व स्थानकांचा विचार करता सरासरी ९४.६६ टक्के काम झाले आहे आणि पाच टक्के काम बाकी आहे, असे ‘एमएमआरडीए’ने माहितीच्या अधिकारातील अर्जावर उत्तर देताना स्पष्ट केले.मेट्रो रेल्वेची स्थानकेच तयार नाहीत शिवाय मेट्रो रेल्वेला सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रियाही अद्याप अंतिम टप्प्यात आलेली नाही. त्यामुळे मेट्रो रेल्वे लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू होण्याची शक्यता कमी आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोनोरेल दाखवण्याची सोय झालेली आहे. त्यामुळे आता मेट्रो रेल्वे बहुधा थेट विधानसभेच्या निवडणुकीआधी सुरू होईल अशी शक्यता आहे.

Story img Loader