‘एअरपोर्ट जाना है? २५० रुपया होगा..’, ‘मीटरसे नहीं, शेअरसे चलना हो तो बैठो..’ घाटकोपर पश्चिमेकडील रिक्षावाल्यांकडून ही आणि अशी अरेरावीची वाक्ये आजवर ऐकण्याची सवय असलेल्या प्रवाशांना सध्या सुखद धक्का बसत आहे. अगदी मेट्रो सुरू होण्याच्या आधीच्या रात्रीपर्यंत चाललेली ही रिक्षाचालकांची अरेरावी अचानक संपुष्टात आली असून आता रिक्षाचालक स्वत:हूनच ‘साहब, किधर जाना है.. बैठो ना.. मीटर से छोडेंगे’ असा विनम्रपणा दाखवत आहेत. पण आता मेट्रोमुळे प्रवास सुखकर झाल्याने प्रवाशांनीच या रिक्षाचालकांकडे पाठ फिरवली आहे.
साकीनाका, असल्फा, मरोळ येथे काम करणारे अनेक प्रवासी घाटकोपरला उतरून पश्चिमेकडे बेस्ट किंवा रिक्षाचा पर्याय वापरत होते. मात्र या रस्त्याला असलेली नेहमीची वाहतूक कोंडी आणि खच्चून भरलेल्या बेस्टच्या बसगाडय़ा यामुळे बहुतांश प्रवासी शेअर रिक्षाचा मार्ग निवडत होते. या मार्गावर रिक्षाचालकांनी ठरवलेले जादा भाडे दिल्याशिवाय प्रवाशांना गत्यंतर नव्हते. तसेच एखाद्या प्रवाशाने थेट रिक्षा पकडण्याचा प्रयत्न केल्यास अव्वाच्या सव्वा भाडे सांगितले जात असे. मीटरने का येणार नाही, असे विचारल्यास रिक्षावाल्यांची अरेरावी सहन करावी लागत होती.
रिक्षावाल्यांच्या या मग्रुरी आणि मुजोरीमुळे संत्रस्त झालेले प्रवासी आपल्या डोक्यावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाकडे पाहून मनातला राग मनातच गिळत होते. अखेर ८ जून रोजी मेट्रोला हिरवा कंदील मिळाल्यावर प्रवाशांनी रिक्षाचालकांच्या माजोरडय़ा स्वभावाचा वचपा काढत मेट्रोचा पर्याय वापरण्यास सुरुवात केली. वातानुकूलित, आरामदायी आणि वक्तशीर प्रवासामुळे मेट्रो आठवडाभरातच लोकप्रिय झाली.
मेट्रोच्या या लोकप्रियतेमुळे रिक्षावाल्यांच्या धंद्याला मात्र चांगलाच फटका बसला आहे. घाटकोपर ते साकीनाका हा प्रवास नेहमीच करणाऱ्या सुयोग शहाणे यांना विचारले असता, मेट्रोचा पर्याय असताना रिक्षाचालकांची मुजोरी का सहन करायची, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यांच्यासारखीच प्रतिक्रिया नूतन वैशंपायन यांनीही दिली. हे रिक्षाचालक अत्यंत बेदरकारपणे रिक्षा चालवतात. त्यांना हळू चालवण्यास सांगितले, तरी ते दुर्लक्ष करतात. त्यापेक्षा मेट्रो केव्हाही सुरक्षित आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच मेट्रो सुरू झाल्यापासून रिक्षाचालक स्वत:च विनम्रपणे ‘साहब, कहाँ जाना है..’ असे विचारत असल्याचेही प्रवासी सांगत आहेत.
मुजोर रिक्षाचालकांना विनम्रतेचे धडे अखेर मेट्रोने शिकविले
‘एअरपोर्ट जाना है? २५० रुपया होगा..’, ‘मीटरसे नहीं, शेअरसे चलना हो तो बैठो..’ घाटकोपर पश्चिमेकडील रिक्षावाल्यांकडून ही आणि अशी अरेरावीची वाक्ये आजवर ऐकण्याची सवय असलेल्या प्रवाशांना सध्या सुखद धक्का बसत आहे.
First published on: 18-06-2014 at 01:13 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro taught lesson to insubordinate rikshaw drivers