वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर उभारण्यात येत मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा सप्टेंबर २०१३ मध्ये सुरू करण्यासाठीच्या प्रयत्नांना आता गती येत आहे. ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’ने मेट्रो रेल्वे चालवण्याबरोबरच सिग्नल यंत्रणेशी ताळमेळ साधत, दूरसंचार यंत्रणेमार्फत संदेशांचे आदान-प्रदान करत मेट्रोची एकात्मिक चाचणी यशस्वी झाली आहे. आता मेट्रो धावताना सिग्नल यंत्रणेसह विविध यंत्रणा व्यवस्थित कार्यरत राहतात की नाही याचीही चाचणी सुरू झाली आहे.
मेट्रो रेल्वे धावत असताना सिग्नल यंत्रणा व्यवस्थित काम करते की नाही, गाडीचे दरवाजे बंद करण्यासारख्या महत्त्वाच्या संदेशांची अंमलबजावणी नीट होते की नाही या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यात येत
असून याबाबतच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. त्याचबरोबर मेट्रोचा
वेग मर्यादेपेक्षा अधिक वाढल्यास त्यावर नियंत्रणासाठी आणि इतर संकटावेळी आपत्कालीन ब्रेक लागण्याची चाचणीही यशस्वी
झाली आहे.
मेट्रोचे उत्पादन करणाऱ्या चीनच्या ‘सीएसआर नानजिंग’, सिग्नल यंत्रणा पुरवणाऱ्या जर्मनीच्या ‘सीमेन्स’ आणि दूरसंचार यंत्रणा उभारणाऱ्या थालेस या ऑस्ट्रियाच्या कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मेट्रोची सर्वागणी चाचणी होत आहे. शिवाय त्यावर तांत्रिक सल्लागारांची नजर आहे. त्रयस्थ अभियांत्रिकी तज्ज्ञ म्हणून नेमलेल्या लुईस बर्जरचे तज्ज्ञही या विविध यंत्रणांचा मेळ घालून होणाऱ्या एकात्मिक चाचणीवर लक्ष ठेवून आहेत. स्वयंचलित मेट्रो सुरक्षा यंत्रणा आणि स्वयंचलित संचालन आणि नियंत्रण यंत्रणेची तपासणीही सुरू झाली आहे.

Story img Loader