पिंपरी ते स्वारगेट दरम्यान मेट्रो प्रकल्प राबविण्याचा मूळ निर्णय बदलून मेट्रो कात्रजपर्यंत आणि आता ती त्याहीपुढे आंबेगावपर्यंत नेण्याचा ठराव महापालिकेच्या मुख्य सभेत एकमताने मंजूर करण्यात आला असला, तरी मेट्रोचा प्रकल्प अहवाल एकीकडे आणि मेट्रो निघाली दुसरीकडे असा प्रकार आता सुरू झाला आहे.
मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या मार्गाला मंजुरी देताना हा मार्ग विमानतळापर्यंत न्यावा, असा ठराव पुणे महापालिकेत दोन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला होता. हाच मार्ग एसएनडीटी ते वारजे असा विस्तारित करावा असाही निर्णय पुढे मुख्य सभेने घेतला. त्यानंतर पिंपरी ते स्वारगेट या मूळ मेट्रो मार्गात बदल करून तो मार्ग पिंपरीच्यापुढे निगडीपर्यंत वाढवावा, असा ठराव पिंपरी महापालिकेने केला, तर मेट्रो स्वारगेट ऐवजी कात्रजपर्यंत नेण्याचा ठराव पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने गेल्या आठवडय़ात मंजूर केला. मेट्रो कात्रजपर्यंत नेण्याचा हा ठराव सोमवारी अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेपुढे आल्यानंतर मेट्रो कात्रजच्यापुढे महापालिका हद्दीपर्यंत न्यावी, अशी उपसूचना देण्यात आली आणि त्या उपसूचनेसह मूळ ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावामुळे मेट्रो आता आंबेगावपर्यंत न्यावी लागेल.
मार्ग असा वाढवता येतो का?
मुळात, फक्त पिंपरी ते स्वारगेट याच मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तयार करून दिला आहे. हा मार्ग आता पिंपरी ते निगडी दरम्यान सहा किलोमीटरने वाढवण्यात आला आहे. तसेच स्वारगेट ते आंबेगाव दरम्यान आठ ते नऊ किलोमीटरने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मूळ डीपीआर साडेसोळा किलोमीटरचा असला, तरी हा वाढीव मार्ग आता चौदा ते पंधरा किलोमीटर इतका झाला आहे. त्यामुळे निगडी ते आंबेगाव हा मार्ग आता एकतीस-बत्तीस किलोमीटरचा होईल आणि त्यातील निम्म्या मार्गाचाच डीपीआर झालेला आहे.
हा मार्ग अशाप्रकारे वाढवायचा असेल, तर पुन्हा दिल्ली मेट्रोकडे जावे लागणार आहे. तसेच नवा प्रकल्प अहवालही करून घ्यावा लागणार आहे. मात्र, या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता उपसूचना देऊन मेट्रोचा मार्ग विस्तारित करण्याचे काम महापालिकेत केले जात आहे. रामवाडीपासून विमानतळापर्यंत जो एक-दीड किलोमीटरचा मेट्रो मार्ग वाढवला जाणार आहे त्याचा प्रकल्प अहवालही अद्याप तयार करून घेण्यात आलेला नाही ही वस्तुस्थिती असली, तरी उपसूचनांच्या माध्यमातून मेट्रोचा मार्ग वाटेल तेवढा वाढवला जात आहे. मेट्रोचा मार्ग उपसूचना देऊन वाढवता येतो, असे चित्र आता निर्माण झाले असून एखाद्या पीएमपी बसचा मार्ग विस्तारित करावा त्याप्रमाणे मेट्रो मार्गाची लांबी वाढविण्याचे काम महापालिकेत केले जात आहे.      
  अहवालात काय होते आणि काय केले..
– मूळ मार्ग वनाझ ते रामवाडी
– नवा मार्ग वनाझ ते लोहगावपर्यंत
– मूळ मार्ग पिंपरीपासून सुरू
– नवा मार्ग निगडीपासून सुरू
– मूळ मार्ग पिंपरीपासून स्वारगेटपर्यंत
– नवा मार्ग स्वारगेटच्यापुढे आंबेगावपर्यंत

Story img Loader