‘म्हाडा’तर्फे मानखुर्द येथील ११११ घरांसाठी २०१० मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीमधील घरांच्या ताब्यासाठी भोगवटा प्रमाणापत्राचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे या विजेत्यांची ताब्यासाठी तब्बल सव्वा दोन वर्षांपासून सुरू असलेली प्रतीक्षा अद्याप कायम असून दिवाळीपर्यंत ताबा देण्याचा ‘म्हाडा’चा प्रयत्न अपयशी ठरला आहे. घराच्या सोडतीत विजेते ठरल्याचा यशस्वी अर्जदारांचा आनंद क्षणिक ठरला आणि घर मिळत नसल्याचा मनस्ताप दोन वर्षे सहन करावा लागत आहे.
‘म्हाडा’तर्फे २०१० मध्ये आर्थिक दुर्बल, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट व उच्च उत्पन्न गटासाठी मिळून एकूण ३४४९ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्यासाठी तब्बल तीन लाख २८ हजार लोकांनी ‘म्हाडा’च्या या घरांसाठी अर्ज केला होता. मानखुर्द येथे आर्थिक दुर्बल गटासाठी १०१८ आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ९३ घरे होती. मे २०१० मध्ये सोडत निघाली आणि विजेत्यांची यादी जाहीर झाली. मात्र, पाण्याच्या उपलब्धतेअभावी मानखुर्दमधील घरांसाठी पाणी देता येणार नाही व त्यामुळे ‘भोगवटा प्रमाणपत्र’ (ओसी) देता येणार नाही, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याचवेळी जाहीर केले. तसेच मानखुर्दमधील घरांकडे जाण्यासाठी पुरेशा रूंदीचा पक्का रस्ता नसल्यानेही ‘ओसी’ देण्याबाबत असमर्थता दर्शवली होती.
नंतरच्या काळात पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. पण ‘म्हाडा’च्या वसाहतीकडे जाण्यासाठी मोठा पक्का रस्ता बांधण्यात अतिक्रमित झोपडय़ांची अडचण होती. परिणामी ‘म्हाडा’च्या या ११११ घरांचा ताबा यशस्वी अर्जदारांना देणे शक्य होत नव्हते व या ११११ अर्जदारांचा घर मिळाल्याचा आनंद हिरावला गेला होता. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे ‘म्हाडा’कडे खेटे सुरू होते.
मात्र आता ‘म्हाडा’तर्फे १२ मीटर रूंदीच्या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात येत असून त्याआधारे ‘ओसी’ मिळवण्याचे काम सुरू झाले. यानंतर महिना-दीड महिन्यात भोगवटा प्रमाणपत्र मिळेल आणि विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेल, असे ऑगस्टमध्ये ‘म्हाडा’तर्फे सांगण्यात आले होते. पण आता चार महिने उलटून गेले तरीही प्रश्न सोडवण्यात ‘म्हाडा’ला यश आलेले नाही.
मानखुर्दमधील ११११ घरांच्या भोगवटा प्रमाणपत्राचा प्रश्न येणार असे लक्षात आल्यावर विजेत्या अर्जदारांकडून प्रमाणपत्र मिळेपर्यंत कसलेही पैसे घ्यायचे नाहीत, असे ठरवण्यात आले. सुरुवातीच्या अनामत रकमेचे दहा-पंधरा हजार रुपये ‘म्हाडा’कडे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा