प्रतीक्षा नगरातील १९६ घरांखेरीज २०११ मधील इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र
‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे २०११ मध्ये काढण्यात आलेल्या ४०३४ घरांच्या सोडतीपैकी प्रतीक्षा नगर (टप्पा ४) येथील १९६ घरांच्या इमारतीचा अपवाद वगळता बाकीच्या सर्व इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असल्याने ४०३४ पैकी ३८३८ घरांच्या ताब्याचा प्रश्न सुटला आहे. ताबा देण्याची प्रक्रियाही सुरू झालेली आहे.
‘म्हाडा’ने २०११ मध्ये काढलेल्या सोडतीत ३३६ घरे तयार होती. तर ३६९८ घरांचे बांधकाम सुरू होते. घरांचे बांधकाम झाल्यानंतरही गेल्या वर्षभरात या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळत नसल्याने घरांचा ताबा रखडला होता. घरासाठी मोठी रक्कम घेतली, कर्ज घेतले, त्याचे हप्तेही सुरू झाले. त्यामुळे अनेकांची आर्थिक फरफट सुरू झाली. गेल्या सात-महिन्यांपासून लवकरच भोगवटा प्रमाणपत्र मिळेल, असे आश्वासन ‘म्हाडा’तर्फे दिले जात होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली गेल्या काही दिवसांत जवळपास सर्वच योजनांमधील इमारतींना मुंबई महानगरपालिकेतर्फे भोगवटा प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे ३६९८ पैकी ३५०२ घरांच्या ताब्याचा प्रश्न सुटला असून प्रत्यक्ष ताबा देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
बाकी सर्व योजनांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले तरी शीव येथील प्रतीक्षा नगर (टप्पा चार) येथील मध्यम उत्पन्न गटातील १९६ घरांचा ताबा मात्र भोगवटा प्रमाणपत्राअभावी रखडला आहे. याबाबत ‘म्हाडा’कडे चौकशी केली असता, प्रतीक्षा नगर (टप्पा चार) येथील इमारतींच्या भोगवटा प्रमाणपत्राचा विषयही आता मार्गी लागत आहे. प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून येत्या आठ-पंधरा दिवसांत भोगवटा प्रमाणपत्र मिळेल. त्यानंतर लगेचच ताबा प्रक्रियाही सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
म्हाडाच्या ३८३८ घरांच्या ताब्याचा प्रश्न मिटला
प्रतीक्षा नगरातील १९६ घरांखेरीज २०११ मधील इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे २०११ मध्ये काढण्यात आलेल्या ४०३४ घरांच्या सोडतीपैकी प्रतीक्षा नगर (टप्पा ४) येथील १९६ घरांच्या इमारतीचा अपवाद वगळता
First published on: 26-06-2013 at 08:00 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada 3838 houses question sloved