रहिवाशांना होणारा त्रास आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असा शहाणपणाचा विचार करून मालाडच्या दिंडोशीमधील शिवधाम संकुलातील मैदानावर सहस्रचंडी हवनात्मक महायज्ञाच्या आयोजनास अगोदर स्पष्ट नकार देणाऱ्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाला (म्हाडा) अचानक परमार्थाचा साक्षात्कार झाल्याने, स्थानिक रहिवासी अचंबित झाले आहेत. रहिवाशांचा अक्षेप मान्य करून अगोदर म्हाडाने या महायज्ञास परवानगी नाकारल्याने गोंधळातून सुटका झाल्याचा निश्वास टाकणारे रहिवाशांसी या नव्या कोलांटउडीचा अर्थ शोधू लागले आहेत. अचानक पुन्हा या महायज्ञाला परवानगी देऊन तमाम रहिवाशांना वेठीस धरत म्हाडाने आपलेच लेखी आश्वासनदेखील गुंडाळून टाकल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शिवधाम संकुलातील म्हाडाच्या मैदानावर गेल्या आठ-नऊ वषांपासून माँ वरदायनी समितीतर्फे सहस्त्रचंडी हवनात्मक महायज्ञाचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून महायज्ञाच्या निमित्ताने या परिसरात दिवसभर भाविकांची गर्दी उसळू लागल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला. यंदा या महायज्ञासाठी २५ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत हे मैदान देण्यात यावे असे पत्र माँ वरदायनी समितीने म्हाडाला पाठविले होते. प्रत्यक्षात २४ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत या मैदानावर महायज्ञ करण्यात येणार होता. ऐन परीक्षांच्या काळात होऊ घातलेल्या या महायज्ञाच्या आयोजनाचे वृत्त समजताच स्थानिक रहिवाशांनीम्हाडाच्या कार्यालयात धाव घेतली. महायज्ञाला परवानगी देऊ नये अशी लेखी तक्रार शिवधाम संकुल असोसिएशन आणि शिवधाम संकुल नागरिक मंचने म्हाडाकडे केली. यज्ञासाठी येणारे यजमान, पुरोहित, भक्तगण आणि इतर कर्मचाऱ्यांमुळे या परिसरात अस्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. तसेच ध्वनी, वायू प्रदूषण वाढते, परीक्षा जवळ आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो, गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिक, महिलांना त्रास होतो, असे असोसिएशन आणि मंचने आपल्या तक्रारीत म्हटले होते. या बाबी विचारात घेऊन म्हाडाने या महायज्ञासाठी मैदान देण्यास स्पष्ट नकार दिला. म्हाडाने २१ फेब्रुवारी रोजी तसे पत्रच माँ वरदायनी समितीला पाठविले.
म्हाडाने परवानगी नाकारल्यामुळे आता महायज्ञ होणार नाही, असे वाटल्याने स्थानिक रहिवाशांनीही सुटकेचा निश्वास टाकला. संघटितपणे उभे राहिल्यास विरोधाला धार येते हा अनुभव या रहिवाशांनी प्रसारमाध्यमांमार्फत समाजापर्यंत पोहोचविला, आणि दुसऱ्याच दिवशी रहिवाशांना नवा धक्का बसला. म्हाडाला अचानक परमार्थाचा साक्षात्कार झाला आणि हे मैदान महायज्ञासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. २५ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीसाठी मैदान वापरण्यास दिलेली तात्पुरती परवानगी रद्द करण्यात आल्याचे म्हाडाने २८ फेब्रुवारी रोजी माँ वरदायनी समितीला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र,  १ ते १५ मार्च कालावधीत हे मैदान धार्मिक कार्यक्रमाठी देण्यात येत असल्याचेही याच पत्रात नमूद करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही अशी अट घालण्यात आली आहे. नाकारलेली परवानगी अचानक पुन्हा देण्याच्या म्हाडाच्या अजब कारभारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Story img Loader