उंच इमारतीमधील वरच्या मजल्यांवरचे हवेशीर घर हे मुंबईकरांचे स्वप्न. पण ‘म्हाडा’च्या २०११ मधील सोडतीमध्ये घर मिळालेल्यांना मात्र उंच इमारतींमधील घराचा चांगलाच फटका बसला आहे. सोडतीनंतर दोन वर्षांनी घरांचा ताबा मिळत असल्याचा आनंद होत असताना मुंबई महापालिकेच्या मालमत्ता करामुळे या घरांचा देखभाल खर्च जवळपास दुप्पट झाल्याने ‘म्हाडा’च्या लाभार्थ्यांचे डोळेच पांढरे झाले आहेत. त्यामुळे घराच्या ताब्याचा आनंदावरही विरजण पडले आहे.
‘म्हाडा’ने २०११ मध्ये ४०३४ घरांसाठी सोडत काढली होती. त्यात दुर्बल आर्थिक गटासाठी २५६ घरे अल्प उत्पन्न गटासाठी ३१३३ घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी २८० घरे आणि उच्च उत्पन्न घरांसाठी ३६५ घरे होती. मागच्या वर्षी ‘म्हाडा’ने याच सोडतीमधील अल्प उत्पन्न गटातील मालवणी येथील सुमारे २३५० घरांसाठी अडीच लाख रुपये वाढीव घेण्याचा निर्णय घेतला होता. सोडतीत मालवणीमध्ये घर मिळालेल्यांना घराची रक्कम अडीच लाखांनी वाढवून जोरदार आर्थिक दणका दिल्यानंतर आता या घरांचा ताबा घेत असताना या घरांचा देखभाल दुरुस्तीचा खर्च पाहून अर्जदारांचे डोळे पांढरे झाले आहेत. मालवणीतील २३५० घरांबरोबरच, शिंपोलीतील ५६४ अल्प उत्पन्न गटातील आणि त्याच ठिकाणच्या उच्च उत्पन्न गटातील १७२ घरांनाही या देखभाल खर्चातील वाढीचा फटका बसला आहे.
एरवी या घरांचा देखभाल खर्च सुमारे २५०० ते तीन हजार रुपयांच्या आसपास असतो. पण आता ‘म्हाडा’च्या नव्या गणितानुसार या लाभार्थ्यांना सुमारे साडेपाच हजार रुपये दरमहा देखभाल खर्चापोटी मोजावे लागणार आहेत. तर उच्च उत्पन गटातील घर मिळालेल्यांना तब्बल पावणे सात हजार रुपये दरमहा देखभाल खर्चापोटी द्यावे लागतील.
मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या आकारणीमुळे देखभाल खर्चात वाढ झाली आहे. इतर खर्चात फारशी वाढ नाही. त्यामुळे या वाढीव देखभाल खर्चाबाबत फेरविचार होण्याची शक्यता नाही, असे ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.