वांद्रे-कुर्ला संकुलासारख्या आलिशान व्यावसायिक केंद्राच्या लगत आलिशान निवासी संकुल उभारण्याची योजना ‘म्हाडा’ने तयार केली खरी पण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात यासाठीच्या जमीन वापरातील बदलाचा प्रस्ताव अद्याप धूळ खात पडून असल्याने ‘म्हाडा’चे चकचकीत स्वप्न कागदावरच रखडून पडले आहे.
वांद्रे-कुर्ला संकुल हे २१ व्या शतकातील मुंबईतील आधुनिक व्यापारी केंद्र ठरले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बँकांपासून डायमंड मार्केटसारखी बडी आस्थापने या संकुलात आहेत. त्यामुळे संकुलाच्या जवळच तशीच आधुनिक व आलिशान निवासस्थाने निर्माण होणे ही गरज ठरली आहे. ‘म्हाडा’ने ही गरज ओळखत वांद्रे-कुर्ला संकुलाच्या तोंडावर असलेल्या भारतनगर येथील आपल्या संक्रमण शिबिराच्या पुनर्विकासाची योजना आखली होती.
भारतनगरमध्ये १९९० च्या सुमारास म्हाडाने संक्रमण शिबिरे उभारली. सुमारे ७५० गाळे तिथे आहेत. या जागेवर आलिशान निवासी संकुल उभारल्यास वांद्रे-कुर्ला संकुलात काम करणाऱ्या बडय़ा अधिकाऱ्यांना सोयीचे होईल. त्यामुळे ही घरे बाजारपेठेच्या दराने कोटय़वधी रुपयांना विकता येतील. त्यातून मिळणारा पैसा सर्वसामान्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांच्या कामासाठी वापरता येईल, असे नियोजन आहे. त्यानुसार या जागेवर सुमारे एक हजार चौरस फुटांची ३५० आलिशान घरे बांधण्याची योजना ‘म्हाडा’ने आखली.
मात्र, ही जागा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित येते. निवासी संकुलाच्या बांधकामासाठी या जागेच्या वापराबाबतच्या अटी बदलण्याची गरज आहे. सध्या ही जागा व्यापारी वापरासाठी असून तिचे रूपांतर निवासासाठीच्या जागेत करायचे आहे. तसा प्रस्तावही ‘म्हाडा’ने तयार केला आणि मंजुरीसाठी तो एमएमआरडीएकडे पाठवला. पण या प्रस्तावावर निर्णय झालेला नाही. तो पडून असल्याने ‘म्हाडा’ची योजना कागदावरच रखडून पडली आहे.

Story img Loader