‘मुख्यमंत्र्यांच्या कोटय़ा’साठी म्हाडाने उपलब्ध करून दिलेले १६ भूखंड गेल्या पाच वर्षांपासून विनावापर पडून आहेत. या भूखंडांचे वितरण अद्याप झालेले नाही. हे भूखंड परत मिळविण्यासाठी म्हाडाने हालचाली सुरू केल्या आहेत. हे प्रयत्न यशस्वी झाल्यास या भूखंडांवर सामान्यांसाठी सुमारे अडीच हजार घरे होऊ शकतात, असे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.
दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाच्या काळात २००७ मध्ये ‘म्हाडा’चे १६ भूखंड मुख्यमंत्री कोटय़ातून वितरित करण्यासाठी देण्यात आले होते. इच्छुकांकडून अर्ज मागवल्यानंतर तब्बल सुमारे २२०० अर्ज त्यासाठी आले. मात्र, त्यावेळी प्रत्यक्षात भूखंड वितरण झालेच नाही. नंतर मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण आले. त्यांच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले. पण या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी हे भूखंड वाटले नाहीत. त्यामुळे कोणालाही वितरित न झालेले हे भूखंड ‘म्हाडा’ला परत मिळण्याची शक्यता आहे. हे १६ भूखंड एकूण ४२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे आहेत. मालाड, चारकोप, विक्रोळी, दिंडोशी, अंधेरी, बोरिवली, सांताक्रूझ यासारख्या मोक्याच्या जागी हे भूखंड आहेत. सर्वसामान्यांसाठी घरे बांधण्याची जबाबदारी असलेल्या ‘म्हाडा’कडे घरांसाठी फारशी जागा उरलेली नाही. त्यामुळे मुंबईबाहेर लगतच्या परिसरात घरे बांधण्यास ‘म्हाडा’ने सुरुवात केली आहे.
या पाश्र्वभूमीवर वितरणाअभावी रिकामे पडून असलेले हे १६ भूखंड ‘म्हाडा’साठी महत्त्वाचे ठरू शकतात. ते परत मिळाल्यास सामान्यांसाठी घरे उभारण्यासाठी जागा उपलब्ध होईल. या जागेवर सुमारे अडीच हजार घरे बांधता येतील, असा प्राथमिक अंदाज आहे. तसे झाल्यास सर्वसामान्यांना मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घरे मिळू शकतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा