कधी एकेकाळी मंदिरांचे स्वरूप अत्यंत लहान असणाऱ्या जिल्ह्यातील म्हसदी येथील धनदाई आणि निजामपूर-भामेर रस्त्याजवळील म्हसाई देवी तीर्थस्थानांचे स्वरूप अलीकडे अतिशय बदलले आहे. नवरात्रोत्सवात खान्देशातील भक्तगण या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. या दोन्ही देवस्थानांचा जीर्णोद्धार करण्यात आल्यामुळे भाविकांसाठीही त्याचा लाभ झाला आहे. या दोन्ही देवस्थानांच्या बदलत्या स्वरूपाविषयी..
खान्देशासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली साक्री तालुक्यातील म्हसदी येथील धनदाई देवी ५१ कुळांची दैवत म्हणून ओळखली जाते. गावातील तरुण ऐक्य मंडळाच्या देखरेखीखाली मंदिराचा व परिसराचा कायापालट झाला आहे. पूर्वी अतिशय लहानसे स्वरूप असलेले मंदिर आता विस्तीर्ण झाले आहे. नैसर्गिक वातावरणात आणि गावापासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकासांतर्गत ४७ लाखांच्या निधीतून भक्त निवासही आकाराला आले आहे.
म्हसदी गावातील १७ तरुणांनी १९७२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तरुणांचा हा गट नंतर तरुण ऐक्य मंडळ म्हणून ओळखला जाऊ लागला. नंतर या नावाने मंडळ स्थापन करून तरुणांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी जमवली. आजमितीस मंदिर परिसरातील चार बिघा जमिनीवर वनराई वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमरावती नदीच्या काठावर मंदिर व्यवस्थापनाने स्वतंत्र विहीर खोदून भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. ७० लाख रुपये खर्चाची दुमजली इमारत मंगल कार्यालय म्हणूनही वापरात येत आहे. तसेच १६ खोल्यांची बांधणी करून भक्तगणांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सव तसेच यात्रोत्सव काळात मोठय़ा संख्येने भाविक येत असल्याने व्यवस्थापन समितीवर जबाबदारी वाढते. यामुळे १२ ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातून लक्ष ठेवले जाते. कुठेही अप्रिय घटना घडू नये म्हणून ध्वनिक्षेपकावरून सूचनावजा सावधानतेचे इशारे दिले जातात. या कालावधीत कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवला जातो. स्वयंसेवक आणि भाविक यांच्या मदतीने मंदिराचा एकूण कारभार चालतो. नवरात्रोत्सवातील घटस्थापनेचा पहिला दिवस म्हणजे गाव परिसरात नवचैतन्य देणारा. ध्वजपूजन, चक्रपूजन, यज्ञपूजा, नवचंडी यज्ञ, काकड आरती आणि महाप्रसाद वितरण आदी धार्मिक कार्यक्रमांची या दिवशी रेलचेल असते. विद्युत रोषणाई, महिला व पुरुष भाविकांची दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था, वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा आदी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सोयी-सुविधांनी युक्त असलेल्या धनदाई माता देवस्थानाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे.
 मुख्य रस्त्यापासून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्यास कायमस्वरूपी व्यवस्था होऊ शकेल. त्यादृष्टीने मंडळाने प्रयत्न करावेत अशी भाविकांची अपेक्षा आहे. मंदिराच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळणाऱ्या तरुण ऐक्य मंडळाचे गंगाधर देवरे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष उत्तमराव देवरे, सचिव निरंजन देवरे, कोषाध्यक्ष डॉ. अशोक चव्हाण जबाबदारी सांभाळत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, तरुण ऐक्य मंडळाला राज्य शासनाने वनश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
विजयादशमीच्या सीमोल्लंघनासाठी भाविकांचे पाय भक्तिभावाने वळतात त्या म्हसाई देवीच्या मंदिराचे रूप आता विलक्षण बदलले आहे. साक्री तालुक्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या निजामपूर-भामेर रस्त्यावरील हे मंदिर साधारणत: ३०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते.
या ठिकाणी आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून पूर्वी भाविक देवीच्या सभोवताली दगड-गोटे जमा करून ते इमारतीच्या आकारात रचत असत. सध्या आकर्षक रूप धारण केलेल्या या मंदिराची आख्यायिका तशीच अचंबित करणारी. देवीचे मंदिर दगडी बांधकामात करावयास सुरुवात करण्यात आली. बांधकाम झाले की, रात्रीतून ते आपोआप जमीनदोस्त होई. दिवसा जेवढे बांधकाम होत असे तेवढे रात्रीतून पडत असे. यावर उपाय काय, याविषयी बराच खल झाल्यावर एका साधू महाराजांच्या मार्गदर्शनानुसार बांधकामासाठी तापी नदीचे पाणी आणण्याचे ठरले. बांधकाम सुरू झाले. परंतु, दुसऱ्या दिवशी ते कायम राहील की नाही याबद्दल कारागिरांमध्ये साशंकता होती. मार्गदर्शन करणाऱ्या साधू महाराजांनी या ठिकाणी आश्रय घेतला होता.
दुसऱ्या दिवशी मंदिराचे बांधकाम जसेच्या तसे सुरक्षित असल्याचे दिसून आले. या चमत्काराने कारागीर व भाविक अचंबित झाले. पाहता पाहता पुढील बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर साधू महाराजही अंतर्धान पावले. अशी आख्यायिका आजही सांगितली जाते.
साक्री तालुक्यातील निजामपूर शहराच्या उत्तरेला असलेल्या या मंदिराच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारासह दक्षिण आणि उत्तरेलाही दरवाजे आहेत. कुठल्याही प्रवेशद्वारातून आत गेले की महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली म्हणजे म्हसाई देवीच्या मूर्तीसमोर भक्तिभावाने नतमस्तक होता येते. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निजामपूरच्या व्यापाऱ्यांसह अनेक जण पुढे आले. खाचखळगे, डोंगर उताराचा हा भाग सपाट करून वृक्षसंपदा वाढविण्यात आली आहे. आधुनिक सामग्रीचा वापर करून मंदिर विकासाचा ध्यास भाविकांनी घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा