वन खात्याने जेरबंद केलेल्या चार बिबटय़ांवर कायम लक्ष राहावे यासाठी त्यांना मायक्रोचिप लावण्यात आलेल्या आहेत. मात्र, नरभक्षक बिबट वगळता इतर बिबटय़ांना निसर्गमुक्त करण्यासाठी सात सदस्यीय समिती गठीत करण्यात असून अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखालील समिती याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये बिबटय़ा व पट्टेदार वाघांनी धुमाकूळ घालून २५ दिवसात आठ लोकांचा बळी घेतला. त्यामुळे वन खाते व गावकऱ्यांमध्ये संघर्ष उभा ठाकला आहे. बिबटय़ाचा बंदोबस्त करा अन्यथा आम्ही त्याला ठार करू अशी धमकीच गावकऱ्यांनी दिल्याने वन्य जीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नकवी यांनी बिबटय़ाला जेरबंद करा किंवा गोळय़ा घालण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशावरून शार्प शूटर्सची सहा पथके तयार करून बिबटय़ाचा शोध घेतला जात होता. तर नरभक्षक बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी जंगलात दहा पिंजरे लावण्यात आले. गेल्या १९ दिवसात या पिंजऱ्यात तीन बिबट जेरबंद झाले. त्यापैकी तीन बिबट मोहुर्ली येथे तर एक बिबट रामबाग नर्सरी व एक ब्रम्हपुरीत आहे. यातील दोन बिबट वर्षभरापासून पिंजऱ्यात अडकून पडले आहेत. मात्र यातील नेमका कोणता बिबटय़ा नरभक्षक आहे हे ठरविणे कठीण आहे. त्यामुळे या चारही बिबटय़ांना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कडूकर व डॉ. छोंनकर यांनी मोहुर्ली येथे मायक्रोचिप लावल्या. चारही बिबट मायक्रोचिप लावून जंगलात सोडण्यासाठी तयार आहेत.
या बिबटय़ांपैकी एखादी बिबट नरभक्षक असेल तर मायक्रोचिपच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवणे सहज शक्य होणार आहे. परंतु, या बिबटय़ांना जंगलात सोडण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यासाठी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. ही समिती बिबटय़ांना जंगलात सोडायचे की नाही हा निर्णय घेणार आहे. यासोबतच बफर झोनमधील गावात मानव व वन्यप्राणी संघर्ष उद्भवू नये यासाठी वन खात्याने विविध कार्यक्रमांची आणखी केलेली आहे. यामध्ये गावकऱ्यांनी पहाटे उठून जंगलात न जाता साधारणत: आठ वाजता जावे असा नियम करण्यात आलेला आहे. यासोबतच वन्यप्राणी गावात येवू नये म्हणून बफर झोनमध्ये १२ सोलर पंप बसवण्यात आले आहेत. या सोलार पंपाच्या माध्यमातून बिबट तसेच पट्टेदार वाघ व इतर वन्यजीवांना पिण्याचे मुबलक पाणी दिले जात आहे.
पायली, भटाळी, आगरझरी, बोर्डा, चोरगांव, वायगाव तीन पथक दिवसरात्र गस्त घालत आहे. सहायक उपवनसंरक्षकाच्या नेतृत्वात पोलीस दलाचे दोन शार्प शूटर, स्थानिक कर्मचारी व स्वयंसेवी पथकाच्या सदस्यांचा यात समावेश आहे. वन विभागाने या परिसरात जवळपास ५० कर्मचारी तैनात केलेले असून हे सर्व जंगलात पिरून वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवत आहे. शार्प शुटरची सहा पथके याच परिसरात फिरत असल्याची माहितीही वनाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. यासोबतच वन्यप्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही विविध उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत. सध्यातरी बिबटय़ांनी गावात शिरून धुमाकूळ घालू नये, याकडे वन खात्याने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले असून त्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याची माहिती दिली. तसेच बिबटय़ाचे पगमार्कही घेतल्या जात आहे. दरम्यान समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नरभक्षक बिबट वगळता इतर सर्व बिबटय़ांना निसर्गमुक्त करण्यात येणार आहे. सध्यातरी वन खाते या समितीच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा