तुभ्रे एमआयडीसीमधील इंदिरानगर जवळ असणाऱ्या एमआयडीसीच्या भूखंडावर रातोरात झोपडय़ा उभारण्याचे काम सुरू होते. या झोपडय़ांवर मंगळवारी एमआयडीसी व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. झोपडपट्टी दादांच्या माध्यमातून हा गोरख धंदा सुरू होता. या जागेवर उभारण्यात आलेल्या झोपडय़ा या गरजूंना विकण्याचा प्रकार येथे सुरू होता. हा प्रकार परिसरातील सुज्ञ नागरिकांनी एमआयडीसी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.  
तुभ्रे येथील इंदिरानगर परिसरात असणाऱ्या मयूर कोल्ड येथे एमआयडीसीच्या भूखंडावर झोपडय़ा उभारण्याचे काम करण्यात येते. चुना मारून जागा अडवण्याचे काम या ठिकाणी काही दिवसांपासून सुरू असून बांबू व प्लास्टिकच्या साहाय्याने झोपडय़ा बांधून जागा हडपण्याचे काम सुरू होते. काही स्थानिक राजकीय झोपडपट्टीमाफियांनी गरजूंना ५ ते ७ हजारांना येथील जागा विकण्याचा गोरख धंदा सुरू केला होता. अचानक या ठिकाणी झोपडपट्टी उभारण्यात येत असल्याने काही सुज्ञ नागरिकांनी याची माहिती तुर्भे पोलीस आणि एमआयडीसी प्रशासनाला दिली. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली. सदरील जागा एमआयडीसीची असून या ठिकाणी घरे न घेण्याचे आवाहन तेथील झोपडपट्टी धारकांना केले.
 मंगळवारी एमआयडीसी व नवी मुंबई महानगरपालिकेने येथे उभारण्यात आलेल्या ३०० झोपडय़ांवर कारवाई करत १९ हजार ९५० चौमीचा भूखंड अतिक्रमणमुक्त केला. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  

कुंपण घालणार
एमआयडीसीचे उपअभियंता एस. पी. आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदरील भूखंड एमआयडीसीचा असून या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी फलक लावण्यात येणार असून सुशोभीकरण करून कुंपण घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुन्हा या भूखंडावर अतिक्रमण केल्यास अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.